एक करोडच्या पोर्टफोलिओचं रहस्य
- Wing Commander Pravinkumar Padalkar

- Jul 22, 2023
- 3 min read
आज मार्केट आतापर्यंतच्या सर्वात उच्च पातळीवर आहे. निफ्टी ५० इंडेक्स वीस हजाराच्या जवळ येऊन पोहोचला आहे. रोज नवा विक्रम होतो आहे. मागच्या एका महिन्यात तर मार्केट सतत वरच जात आहे. जवळजवळ एकाच दिशेने. आणि टीव्ही चॅनेल्सवर त्या प्रत्येक क्षणाला लाख मोलाचं महत्व दिल्या जात आहे. तो त्यांचा धंदा आहे. त्यांची रोजीरोटी ही अशा ब्रेकिंग न्युजवर अवलंबुन आहे. रोज त्यांना बोलायला काहीतरी बातमी हवी आहे. आणि बाजार तेजीत चालला आहे यापेक्षा दुसरी कोणतीच बातमी लोकांचं लक्ष वेधून घेणार नाही हेही त्यांना माहिती आहे.
जेंव्हा सर्व जण जोरजोरात ओरडून बाजाराच्या उच्च पातळीची चर्चा करायला लागतात तेंव्हा हि धोक्याची घंटा आहे हे सुजाण गुंतवणूकदारांनी लक्षात ठेवायला हवं. इतिहास हे सांगतो कि बाजारात कधीही काहीही घडु शकतं. हे आपण कितीतरी वेळेस अनुभवलं आहे. जो जोऱ्यात वर जाणार तो तितक्याच वेगाने खालीही येऊ शकतो हा गुरुत्वाकर्षणाचा नियम बाजारालाही लागु होतो.
बाजार एकाच रेषेत कधीच जात नाही. बाजार किती अवखळ, अनपेक्षित आणि अनाकलनीय आहे याचं एक उदाहरण मी खाली देत आहे:-
१. कोणालाही अपेक्षा नसतांना, कोव्हिडनंतर निफ्टी ५० इंडेक्स, मार्च २०२० च्या ७७०० पातळीवरून ऑक्टोबर २०२१ मध्ये १८६०० च्या स्तरावर पोहोंचला. कोव्हिडला न घाबरता जे बाजारात तग धरून उभे राहिले, ज्यांनी या काळात गुंतवणूक सुरु ठेवली त्यांना भरघोस फायदा झाला.
२. पण ऑक्टोबर २०२१ पासून ते जुन २०२३ पर्यंत, जवळजवळ २० महिने, निफ्टी ५० इंडेक्स १८८०० ची पातळी ओलांडु शकला नाही. हा काळ बऱ्याच गुंतवणूकदारांसाठी काळजीचा होता. त्यांचा पोर्टफोलिओ तोट्यात होता, किंवा त्यांच्या अपेक्षेएवढा वाढत नव्हता.
३. पण याच काळात, निफ्टी ५० इंडेक्स, १८६०० या उच्च पातळीवरून १५१०० च्या पातळीपर्यंतही गेला होता. आणि तिथून पुन्हा त्याने १८८०० ची पातळी गाठली होती. त्यामुळे ज्या गुंतवणुकदारांनी ऑक्टोबर २०२१ मध्ये गुंतवणुकीला सुरुवात केली, त्यांचा परतावा हा अतीशय कमी असणार हे स्पष्ट आहे.
४. पण २६ जुन २०२३ च्या १८६०० पातळीवरून फक्त १८ दिवसात, तो १९९९१ या उंचीवर पोहोंचला. वीस महिन्यात जे त्याला जमलं नाही ते केवळ वीस दिवसात घडून आलं.
बाजाराचा हा उतार-चढाव छोट्या अवधीत असाच खाली-वर होत राहतो. आणि याचा कोणीच अंदाज लाऊ शकत नाही. हीच बाजाराची खरी गंमत आहे. परंतु जर कोणताही दहा वर्षाचा कालावधी घेतला तर बाजार हा वरच्या दिशेनेच गेलेला आपणास दिसेल. याचा अंदाज आपण नक्कीच लाऊ शकु. त्यामुळे ज्या गुंतवणूकदारांनी मागील एक ते दोन वर्षात गुंतवणूक सुरु केली आहे आणि त्यांचा परतावा त्यांच्या अपेक्षेपेक्षा कमी आहे असे वाटत असेल तर त्यांनी काळजी करण्याचं कोणतंच कारण नाही. कारण येत्या पाच ते दहा वर्षात तुम्हाला भरघोस परतावा मिळेल. आणि बाजारात जर भरघोस फायदा करायचा असेल तर इतका लांबचा काळ थांबणं हे अत्यावश्यक आहे.
पण जसं बाजाराचं वागणं अनपेक्षित असतं तसंच गुंतवणूकदारांचंही वागणं असतं. एक डिस्ट्रिब्युटर या नात्याने मी अनेक प्रकारच्या गुंतवणूकदारांना भेटतो, बोलतो. प्रत्येक जणांचा गुंतवणुकीकडे बघण्याचा दृष्टिकोन, गुंतवणुकीबद्दलचं त्यांचं वागणं ( इन्वेस्टींग बिहेविअर) निराळं असतं. आणि खरं पाहु जाता गुंतवणुकीतील यश हे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये कोणते फंड तुम्ही घेतले आहेत यापेक्षा तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओशी कसे वागता त्यावर जास्त अवलंबुन आहे. मी हे माझ्या अनेक ब्लॉग्समध्ये समजून सांगितलं आहे.
मी एक उदाहरण देऊन पुन्हा एकदा हे समजाऊन सांगण्याचा प्रयत्न करतो.
माझा एक गुंतवणूकदार आहे. त्याने मागच्या दोन वर्षांपासून गुंतवणुकीला सुरुवात केली आहे. म्हणजे मागील दोन वर्षात बाजारात झालेले चढ-उतार त्याच्या पोर्टफोलिओने बघितले आहेत. आणि तरीही बघता-बघता त्याचा पोर्टफोलिओ एक करोडचा झाला आहे. त्याचं इन्वेस्टींग बेहेविअर कसं आहे हे पाहणं आपणा सर्वांसाठीच लाभदायक ठरेल.
१. एक डिस्ट्रिब्युटर म्हणून, एक सल्लागार म्हणुन त्याचा माझ्यावर संपूर्ण विश्वास आहे. मी त्याच्यासाठी तयार केलेल्या पोर्टफोलिओवर त्याने मला कधीच कोणताच प्रश्न विचारलेला नाही.
२. त्याने दोन वर्षांपुर्वी चालु केलेली SIP अजूनही सुरु ठेवली आहे
३. जेंव्हा जेंव्हा शक्य होईल तेंव्हा तेंव्हा त्याने त्यात अजुन रक्कम गुंतवली आहे
४. बाजार खाली जावो कि वर जावो त्याने कधीच आपला पोर्टफोलिओ बघितला नाही
५. जेंव्हा जेंव्हा बाजार कोसळला तेंव्हा तेंव्हा मी माझ्या सर्व मित्रांना, गुंतवणूकदारांना अजुन थोडेसे पैसे गुंतवणुक करायचा सल्ला दिला. बऱ्याच जणांनी हे लाख मोलाचे बोल ऐकले नाहीत, पण याने ते मानले.
त्याचा पोर्टफोलिओ एक करोडचा झाला हे त्यालाही समजलं नाही. मी जेंव्हा त्याला हे सांगितलं तेंव्हा त्याला फारच नवल वाटलं.
आपण त्याच्या इन्वेस्टींग बिहेविअरचं विश्लेषण केलं तर असं आढळून येईल कि खरं पाहु जाता त्यानं एकच गोष्ट केली आणि ती म्हणजे, "अच्छा हुआ तुमने कुछ नहीं किया.”
गुंतवणुकीमध्ये बऱ्याचवेळेस उगीचच रोजरोज काहीतरी उचापती करीत राहण्यापेक्षा काहीच न केल्याने चांगलाच फायदा होतो हेच या उदाहरणाने आपल्याला दाखवुन दिलं. मला खात्री आहे कि बाजारात कितीही चढ-उतार झाला तरीही त्याचा पोर्टफोलिओ पुढच्या दहा वर्षात नक्कीच याच गतीने वाढत राहील.
बाजारात पैसे कमावणं इतकं सोपं आहे. फक्त शांत बसुन वाट पाहण्याची प्रवृत्ती हवी.
Warren Buffet said, “Beware of the investment activity that produces applause; the great moves are usually greeted by yawns.”
(Disclaimer:-Mutual fund investments are subject to market risks. Please read all scheme related documents carefully before investing)
.png)
Comments