डॉनको पकडना मुश्किलही नहीं नामुमकिन है
- Wing Commander Pravinkumar Padalkar

- Dec 29, 2022
- 4 min read
परवा मी मित्रांबरोबर गप्पा मारत बसलो होतो. रात्र उलटत गेली तशा गप्पा रंगात आल्या. बोलता बोलता अमेरिकेतील मंदीचा विषय निघाला. तिथे IT कंपन्यातून खूप लोकांना काढून टाकण्यात येत असल्याच्या बातम्या इथे पोहोचत होत्या. दिवस खरोखरच अवघड होते. एका मित्राचा मुलगा तिकडे IT कंपनीत काम करत आहे. त्याला मुलाच्या नौकरीची चिंता सतावत होती. वीस लाखाचं शैक्षणिक कर्ज घेऊन त्यानं नुकतंच मास्टर्स केलं होतं. अमेरिकेतून मास्टर्स केल्याचा आनंद अजून ओसरला नाही तोच हि परिस्थिती येऊन ठेपली होती. त्याला नौकरी लागून अजून सहा महिनेही झाले नाहीत. इतकि चांगली नौकरी हातातून जाऊ नये म्हणून हा माझा मित्र रोज अक्षरशः देवाचा धावा करत होता. त्याची हि काळजी मुलाच्या प्रेमापोटी होती आणि ती एकदम रास्त होती. पण त्या न घडलेल्या भीतीच्या चिंतेत तो मला खूपच गुरफटलेला भासला.
दुसरा मित्रही काळजीतच होता. त्याच्या कहाणीचा कांगोरा थोडासा निराळ्या पठडीतला होता. त्याची हि चिंता थोड्याशा हाय लेव्हलची होती. या मंदीच्या सावटामुळे गेल्या सहा महिन्यापासून त्याची डायरेक्टर म्हणून होऊ घातलेली पदोन्नती थांबलेली होती. त्यामुळे त्याचा फार्म हाऊस विकत घ्यायचा बेत पूर्ण होत नव्हता. हि गोष्ट त्याच्या मनाला सलत होती. कधी एकदा डायरेक्टर होईन आणि कधी एकदा फार्म हाऊस विकत घेईन असं त्याला झालं होतं.
एकीकडे मुलाची नौकरी जाऊ नये हि भाबडी आशा तर दुसरीकडे नौकरीत लवकरात लवकर बढती मिळावी, पॅकेज वाढावं हि अपेक्षा. कोणाचं काय तर कोणाचं काय? अपेक्षा, आशा, चिंता, काळजी, भिती. माणसाच्या मनाचे हे विविधरंगी पेच. मनातल्या या अपेक्षा, आशा पूर्ण झाल्या कि सर्वानाच आनंद होतो. पण बऱ्याच वेळेस या अपेक्षा पूर्ण होत नाहीत आणि मग त्या कारणास्तव आपण दुःखी कष्टी होऊन जातो.
“अपेक्षा हे सगळ्या दुःखाचं मूळ कारण आहे (Expectation is the root cause of misery)” गौतम बुद्धानं फार आधीच हे तत्वज्ञान सांगून ठेवलं आहे. हे माहित असूनही आपण दैनंदिन जीवनात याचा अंगीकार करायला कमी पडतो. अपेक्षा ठेवतो, त्यांना गोंजारतो, त्यात गुंतून जातो आणि त्याची परिणीती मग दुःखात होते.
स्टॉक मार्केटच्या बाबतीतही आपलं असंच काही होतं. आयुष्याप्रमाणेच आपण स्टॉक मार्केटकडूनही खुपश्या अपेक्षा केलेल्या असतात आणि कधी कधी भलतंच काहीतरी घडतं. मग आपला स्टॉक मार्केटवरील विश्वासच उडून जातो. त्यानंतर आपण पुन्हा त्याकडे कधीच वळून पाहत नाही. खरंतर यात दर वेळेस प्रमाणे चूक आपलीच असते कारण आपण ठेवलेल्या अपेक्षाच फार अवास्तव असतात.
स्टॉक मार्केटकडून अपेक्षा
थोड्याच दिवसात आपण नवीन वर्षात प्रवेश करत आहोत. या नव्या वर्षात वैयक्तिक जीवनाबरोबरच स्टॉक मार्केटकडूनही आपल्या बऱ्याच अपेक्षा आहेत. दर वर्षीप्रमाणे या दिवसात, "पुढच्या वर्षी मार्केट कुठे जाईल?" हा भाबडा प्रश्न विचारला जातो. खरं पाहू जाता पुढील एका वर्षात, म्हणजे अल्प अवधीत (short term) मार्केटची दिशा आणि दशा अचूक सांगणारा विद्वान अजूनतरी या भूमंडळी अवतरला नाही.
एका वर्षाच्या कालावधीत मार्केट कुठेही जाऊ शकतं. वर जाईल, खाली जाईल किंवा त्याच पातळीवर रेंगाळत राहील. ह्या तीनच शक्यता आहेत. पण यातून अचूकपणे काय घडेल हे सांगणं केवळ अशक्यप्राय आहे. "डॉनको पकडना मुश्किलही नहीं नामूमकिन है.” हाही त्यातलाच प्रकार. म्हणूनच अल्प अवधीसाठी केलेल्या गुंतवणूकीतून कोणतीही अपेक्षा न केलेलीच बरी. त्याचं फलित काय होईल हे देवंच जाणो.
दर वर्षी मार्केटमधील परतावा बदलत राहतो. कधी कमी होतो तर कधी जास्त होतो. सतत बदलत राहणं हाच मार्केटचा अंगभूत गुण आहे. ते आपल्या नित्य क्रमानं चालत राहतं. आपण मात्र आपल्या अपेक्षेच्या तराजूत त्याला तोलून अपेक्षाभंग करून घेतो.
हे सिद्ध करायसाठी सेंसेक्सने मागच्या पाच वर्षात (जानेवारी ते डिसेंबर) दिलेला परतावा खाली दर्शवला आहे. त्याबरोबरच या पाच वर्षात मिळून दिलेला एकूण परतावाही दाखवला आहे. दर वर्षीच्या परताव्यात कितीतरी फरक असल्याचे आपणास आढळून येईल. पण मागच्या पाच वर्षात मात्र ८० टक्क्यांचा भरगोस परतावा मिळाला आहे.
यावरून हे स्पष्ट होईल कि दीर्घ कालावधीसाठी (long term) केलेली गुंतवणूक हि कधीही जास्त फायद्याची ठरते. हा दीर्घ कालावधी कमीत कमी पाच ते दहा वर्षे असला पाहिजे. दीर्घ कालावधीमध्ये स्टॉक मार्केटची शक्यता फक्त एकच असते, ती म्हणजे वरच्या दिशेनेच. आणि हे सांगायला कोणत्याही विद्वानाची आवश्यकता नाही. हे सूर्यप्रकाशा इतकं उघड आणि प्रखर सत्य आहे.
या गोष्टीला दुजोरा देण्यासाठी आपण मागील बावीस वर्षांच्या आकड्यांचं (past data) विश्लेषण करून ते आकडे काय सांगतात ते बघूया.
खालच्या तक्त्यात सेन्सेक्सचे ०१ जानेवारी २००० पासून ते २८ डिसेंबर २०२२ या बावीस वर्षातील वेगवेगळ्या मुदतीसाठीचे रोलिंग रिटर्न्स दिलेले आहेत. रोलिंग रिटर्न म्हणजे या कालावधीत कोणत्याही काळात (१०, ७, ५, ३ किंवा १ वर्षात) सेन्सेक्सने किती परतावा दिला आहे ते दाखवलं आहे. उदाहरणार्थ :- २० नोव्हेंबर २००५ ते १९ नोव्हेंबर २०१५ किंवा कोणत्याही दहा वर्षाच्या कालावधीत सेन्सेक्सने किती परतावा दिला. तसाच ७,५, ३ आणि १ वर्षात किती परतावा दिला याचं विश्लेषण केलेलं आहे.
या तक्त्यावरून आपणास खालील निरीक्षण सहजच काढता येतील:-
१. गुंतवणूक जितकी जास्त वर्षे केली तितकेच ८ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळायची शक्यता वाढत जाते
२. गुंतवणूक जितकी जास्त वर्षे केली तितकेच तोटा होण्याची शक्यता कमी होत जाते. जर आपण ७ किंवा १० वर्षे गुंतवणूक केली तर आपल्याला कधीच नुकसान होत नाही
३. गुंतवणूक पाच वर्ष किंवा त्यापेक्षा कमी केली तर कधी कधी तोटाही सहन करावा लागतो
४. फक्त एकाच वर्षासाठी गुंतवणूक केली तर तोटा होण्याचं प्रमाण हे २५ % आहे हे लक्षात घ्यावं
५. गुंतवणुकीचा कालावधी जितका कमी होत जातो त्याच प्रमाणात परताव्याची अनिश्चितता, अस्थिरता वाढत जाते. जितके स्टॅण्डर्ड डेव्हिएशन जास्त तितकीच वोलॅटिलिटी जास्त
६. सर्वात महत्वाचं म्हणजे म्युच्युअल फंडातून १२ टक्क्यांपेक्षा अधिक परताव्याची अपेक्षा न करणं
७. १ आणि ३ वर्षात दिसणारा जास्तीत जास्त परतावा हा कोव्हीड काळातील आहे. पुन्हा असा परतावा मिळणं केवळ अशक्य आहे हे ध्यानात ठेवावं
यातून आपण हा निष्कर्ष काढू शकतो कि जर म्युच्युअल फंडातून, मनःशांती ढळू न देता (without loosing sleep) संपत्ती कमवायची असेल तर गुंतवणुकीचा कालावधी जितका जास्त तितकं चांगलं. स्टॉक मार्केटमध्ये समाधानपूर्वक पैसे मिळवण्याचा एकमेव कानमंत्र म्हणजे SIP लवकरात लवकर सुरु करून ती कमीतकमी दहा वर्षे चालू ठेवणे.
खरंतर स्टॉक मार्केट असो कि आपलं वैयक्तिक जीवन असो, ह्या दोन्हीचं गणित खूपच साधं, सोपं आणि सरळ आहे. पण आपल्या अनाठायी अपेक्षांनी आणि मनातल्या संभ्रमांनी आपण ह्या सोप्या गणिताला क्लिष्ट बनवून टाकतो. त्यामुळे आयुष्याच्या या इंद्रधनुष्याला उगीचच दुःखाची एक किनार लागून जाते. ती तशी लागू नये म्हणूनच हा अट्टाहास.
या नूतन वर्षात आपणा सर्वांचं आयुष्य इंद्रधनुषी रंगांनी झगमगून जावो हीच सदिच्छा !!!
.png)
Comments