धोनी, मी आणि गुंतवणूक
- Wing Commander Pravinkumar Padalkar

- Jun 3, 2023
- 4 min read
क्रिकेटनं भारताला व्यापून टाकलं आहे. क्रिकेट न आवडणारा अगदी विरळाच. वयस्कर असो कि तरुण, क्रिकेटचे सामने सुरु झाले कि सर्व जण यात रंगून जातात. आयपीएल सारख्या झटपट क्रिकेटनं त्यात वेगळाच रंग भरला आहे. आयपीएल सुरु झालं कि एक महोत्सव असल्यासारखं वातावरण देशभर निर्माण होतं. दिवाळीसारखंच. मैदानावर आणि मैदानाबाहेर आनंद, उत्साह याला उधाण येतं. धकाधकीच्या जीवनात सामान्य माणसाला हे चार क्षण आनंद देऊन जातात. भाकरीची भ्रांत थोड्यावेळेपुरती विसरली जाते. तो क्रिकेटमय होऊन जातो.
अत्याधुनिक कॅमेऱ्याने आणि तंत्रज्ञानाने, मैदानातला एक-एक क्षण आज टीव्हीद्वारे घरोघरी पोहोचतो आहे. त्यामुळे घरात बसूनही आपण जणू मैदानातच आहोत असा भास निर्माण होतो. मग प्रत्येक चेंडूवर मनाचा लोलक दोलायमान होत राहतो. आभाळाला गवसणी घालणारी उंच सिक्स मारली कि उभं राहून टाळ्या वाजवल्या जातात, कॅच सुटला कि हातवारे करून शिव्यांची लाखोली वाहिली जाते. बऱ्याचदा सामना इतका रोमांचकारी होतो कि हार जितीचा निर्णय अगदी शेवटच्या ओव्हरवर विसंबून जातो. आणि मग सगळ्यांचाच जीव टांगणीला लागतो. आजोबा असो, आजी असो, आई, बाबा कि ताई. सगळ्यांच्या नजरा टीव्हीवर खिळलेल्या असतात. काय होणार याची उत्सुकता बळावलेली असते. त्याचा ताण चेहऱ्यावर दिसत राहतो. अशा वेळेस दर चेंडूगणीक श्वास खालीवर होत राहतो. छाती धडधडते. कोणी हात जोडून मनातल्या मनात देवाचा धावा करत राहतं, कोणी आपल्या ठरलेल्या लकी जागेवर चिटकून राहतं, कोणी दुसर्यांनाही जागेवरून उठू देत नाही, तर कुणी इतका ताण सहन न होऊन दुसऱ्या खोलीत निघून जातं.
खरंतर आपण मैदानापासून हजारो किलोमीटर दूर असतो. या सामन्याच्या निर्णयानं आपलं कोणतंही वैयक्तिक नुकसान होणार नसतं. तरीही आपण या खेळात पूर्णतः गुंगून जातो. गुरफटून जातो. झपाटून जातो. सामन्यात होणाऱ्या चढ उतारानुरूप नकळत आपलं मनही सतत वर-खाली होत राहतं. आनंद, राग, निराशा, अपेक्षा हे भाव क्षणाक्षणाला बदलत राहतात. जेंव्हा-जेंव्हा आपण आयपील पाहतो तेंव्हा तेंव्हा मनाची अवस्था हि अशीच होते.
पण मैदानात उभा राहूनही, करोडो लोकांच्या अपेक्षांचं ओझं खांद्यावर वाहूनही, एका माणसाच्या चेहऱ्यावरची साधी एक रेघही बदलत नाही. त्याचं नाव धोनी असतं. आणि मी सामना पाहायचं विसरून त्या अढळ, अचल चेहऱ्याकडे कौतुकमिश्रित नजरेनं पाहात राहतो.
आजूबाजूला दिसणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्ती कशा वागतात, कशा बोलतात याचं निरीक्षण करण्याचा मला छंद आहे. तो माझा अभ्यासाचा विषय आहे. त्या-त्या जनात जे-जे म्हणून चांगलं दिसतं त्याचा आपल्या वागणुकीत मी अंतर्भाव करून घेतो. जे वाईट असतं ते बदलण्याचा प्रयत्न करतो. दर दिवशी नव्या गोष्टी अनुभवायला मिळतात. शिकायला मिळतात. माझं व्यक्तिमत्व कणाकणानं का होईना प्रगल्भ होत जातं. धोनीच्या वागण्यातूनही मला खूप काही शिकता आलं.
मानेवर रुळणारे लांब केस वागवत एक तरुण वीस वर्षांपूर्वी क्रिकेटच्या दुनियेत अवतरला. आला तेव्हा असं वाटलं नाही कि इतकी वर्षे तो टिकेल. पण आज तो केवळ टीकलाच नाही तर त्यानं आपला एक वेगळा ठसा उमटवला. गेली वीसेक वर्षे मी त्याचे सामने अधूनमधून बघतो आहे. इतक्या वर्षात त्याच्या वागण्या बोलण्यात काहीच फरक पडला नाही. तो आधी होता तसाच आजही आहे. तोच साधेपणा, हालचालीतील तीच सहजता, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मनावर असलेला कमालीचा ताबा. शांत, संयमी, अचल, अढळ. शंभर रन बनवले तरीही उड्या मारल्या नाहीत कि शून्यावर बाद झाल्यावर त्रागा केला नाही. कोणी कॅच सोडली तर त्याच्यावर खेकसला नाही कि कोणी आऊट केल्यावर गळ्यात पडून आनंद व्यक्त केला नाही.
खरंतर आजपावेतो त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त प्रतिभावान खेळाडू होऊन गेले. कितीतरी जणांनी जागतीक विक्रम केले. पण कोणीही त्याच्याइतका धीरोदात्त, शांत, संयमी बघितला नाही. राहुल द्रविड आणि सचिन स्वभावानं त्याच्यासारखेच आहेत पण कर्णधारपदाचं ओझं खांद्यावर आलं आणि तेही या ओझ्याखाली दबून गेले. दोघांचही नेतृत्व कौशल्य (लीडरशिप) कमी पडलं. पण धोनीनं हेही साध्य केलं. न ओरडता, न रागावता, आक्रस्ताळेपणा न करता, शांतपणे, समजूतदारपणे संघातील प्रत्येक सदस्याला त्यानं आपलंसं केलं. फक्त तसं करून तो थांबला नाही तर त्यानं प्रत्येकाचं मन हेरून त्यांना प्रोत्साहन दिलं. शिकवलं. मोठं केलं. आणि देशाचं नेतृत्व करू शकेल अशी भावी पिढी निर्माण केली.
मैदानात किंवा मैदानाबाहेर कितीही कठीण प्रसंग असो, धोनी कधीही डगमगून गेला नाही. आलेल्या प्रसंगाला धीरानं तोंड देत गेला. शांत चित्तानं मार्ग काढत गेला. कल्पनेतीत अमाप पैसा आला, जगभर कीर्ती मिळाली पण यानं तो हुरळून गेला नाही. यश त्याच्या डोक्यात शिरलं नाही. त्याचे पाय जमिनीवर भक्कमपणे कायम रोवलेले राहिले. यश खूपसारे लोक मिळवतात. पण एखादाच ते इतक्या संयतपणे निभावून नेऊ शकतो. जणू काहीच घडलं नाही असं. त्याचं हेच वागणं मला मोहवून जातं.
२००८ साली एअर फोर्स स्टेशन जैसलमेरला त्यानं सदिच्छा भेट दिली होती. त्यावेळी त्याच्याबरोबर सामना खेळण्याचं आणि दोन दिवस घालवण्याचं भाग्य मला लाभलं. त्याचं वागणं, चालणं, बोलणं जवळून पाहता आलं. या दोन दिवसात त्याच्या वागण्यात कधीही "मी स्टार आहे" हा गर्व दिसला नाही. मी त्याला टीव्हीवर जसं पाहिलं होतं तो अगदी तसाच होता. किंबहुना त्यापेक्षाही काकणभर सरसच. शांत, संयमी, मितभाषी. एक "थोरो जेंटलमन" म्हणून तो माझ्या मनावर छाप पाडून गेला. ती छाप आजही तशीच कायम आहे.
स्टॉक मार्केटमधील गुंतवणुकीचंही अगदी असंच आहे. हाही एक खेळच आहे. पण जुगार नव्हे. सट्टा नव्हे. हे डोक्याचं काम आहे. या खेळात यशस्वी व्हायचं असेल, चांगले पैसे मिळवायचे असतील तर गुंतवणुकीपेक्षा, तुम्ही गुंतवणुकीबरोबर कसं वागता (बिहेविअरल फायनान्स) हेच जास्त महत्वाचं आहे. मार्केट खाली-वर होणारच. आपण केलेली गुंतवणूक कमी-जास्त होणारच. कधी नफा तर कधी तोटा हे तर मार्केटचं गमक आहे. पण मार्केट कितीही चढउतार करो, आपण जर शांतपणे, ठरलेल्या उद्दिष्टासाठी गुंतवणूक करीत राहिलो तर यात चांगले पैसे मिळणारच हि काळ्या दगडावरची रेघ आहे. यासाठी एकच गोष्ट हवी आणि ती म्हणजे माहीसारखी स्थितप्रज्ञता. बस इतनाही!
रणांगणात युद्धासाठी उभं असतांना, अर्जुनाच्या अनेक प्रश्नांना कृष्णाने जी समर्पक उत्तरे दिली तीच गीता. यात अर्जुनाने कृष्णाला जेंव्हा विचारले कि, "स्थितप्रज्ञ पुरुषाचे लक्षण काय?" त्यावर कृष्ण उत्तरला:-
दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः।
वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते।।2.56।।
“ज्याला दु:खाच्या प्राप्तीची चिंता नाही, ज्याला सुखप्राप्तीची वासना नाही आणि जो आसक्ती, भय आणि क्रोध यापासून पूर्णपणे मुक्त आहे, तो मनुष्य स्थितप्रज्ञ आहे.”
"स्थितप्रज्ञ" या शब्दाचं धोनी हे एक चालतंबोलतं जाज्वल्य उदाहरण आहे. त्यानं दाखवलेल्या या वाटेवर मी प्रयत्नपुर्वक चालतो आहे. आणि तुम्ही?
Do You Have It In You?
.png)
Comments