top of page

कॉम्प्रो, इगो आणि लिव्ह-इन!


मागच्या रविवारी माझी मैत्रीण तिच्या मुलीला घेऊन भेटायला आली. बोलताबोलता गप्पा मुलांच्या लग्नाकडे वळल्या. बघता बघता वर्षे उडून गेली अन मी कधी पन्नाशीत येऊन पोहोचलो माझं मलाच कळलं नाही. दिवस किती झर्रकन निघून गेले. मुलं मोठी झाली. माझ्या मित्रांची मुलं मोठी झाली. पंचविशीत पोहोचली. आणि त्यांच्या आयांची आपल्या मुलांचं लग्न जुळवायला एकच लगबग उडाली. त्यांनी वेगवेगळ्या ऍपवर नोंदी केल्या, प्रोफाइल बनवले, जवळच्या नातेवाईकांना, मित्रांना कळवलं. आणि जोडीदाराचा ऑनलाईन शोध सुरु झाला. मला वाटलं आजकाल ऍपचा जमाना आहे, इन्स्टंट फुड प्रमाणे ऑर्डर दिल्यावर जेवण हजर, तसेच नाव नोंदवलं कि काही महिन्यात लग्न होऊन जाईल. यात इतकं काय मोठं आहे? पण मी पूर्णतः चूक होतो.


वरवर साधी सरळ भासणारी हि बाब किती गंभीर आहे हे तिला बोलल्यावर मला पहिल्यांदाच उमगलं.


आपल्या मुला-मुलींचं लग्न वेळेवर व्हावं हि एक फार मोठी चिंता आज आई वडिलांना पोखरत आहे. मुली तिशीत सहजच पोहोचत आहेत. मूलं पस्तिशीच्या पुढे गेली आहेत. पण अजूनही त्यांची लग्न होत नाहीयेत. त्यांच्या अपेक्षा मॅच करत नाहीएत. मनासारखा जोडीदार त्यांना मिळत नाहीए. वर्षामागून वर्षे सरत आहेत. अविवाहित तरुण, तरुणींची संख्या वाढत चालली आहे. आणि ज्यांची लग्ने झाली आहेत ती फार काळ टिकुन राहत नाहीएत. घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. या समस्येनं आज फार गंभीर रूप धारण केलं आहे. या समस्येचा विखार प्रत्येक स्तरावर जाणवायला लागला आहे. अतीशय वैयक्तिक असणारी 'लग्न' हि बाब आज भयावह सामाजिक प्रश्न बनून आपल्या सर्वाना भेडसावत आहे.


असं का होतंय? कोण चुकतंय? याची कारणं शोधणं गरजेचं झालंय.


सुमारे वीसेक वर्षांपुर्वी, लग्न किती पटापट जुळायची. एखाद्या-दुसऱ्याच लग्नाला वेळ लागायचा. तेंव्हा एकत्रित कुटुंब पद्धती होती. संपूर्ण समाज एकमेकांना घट्ट धरून, एकमेकांच्या आधारानं संघटितपणे उभा होता. प्रत्येक घर, प्रत्येक कुटुंब हे या समाजाचा अविभाज्य घटक होतं. शेजाऱ्यांशी, नातेवाईकांशी, मित्रपरिवाराशी अतूट ऋणानुबंध होते. कोणीच एकटे नव्हते. एकाकी नव्हते. कोणाचीच सुख दुःखे देखील एकटी नव्हती. प्रत्येकाची सुख, दुःखे आसपासच्या चारेक घरांना माहिती असायची. सुख दुःखात शेजारीपाजारी धाऊन यायचे. त्यामुळे लग्न हि वैयक्तिक बाब न राहता एक संपूर्ण सामाजिक सोहळा बनून जायचा. मुलगा/मुलगी पाहण्यापासून ते लग्न होईपर्यंत या सोहळ्यात प्रत्येकाचाच हातभार लागायचा.


त्या काळात मॅचमेकिंग ऍप नव्हते. आपण राहायचो त्या गल्लीतच कोणी पाध्ये, कोणी जोशी स्वर्गातल्या जोड्या जमिनीवर जुळवायचं काम करायचे. तेही अगदी मोफत. कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता. निस्वार्थपणे. एक सामाजिक कार्य म्हणून. त्या काळात, गावातल्या सगळ्या पोरा-पोरींची लग्नें हि याच चालत्या-बोलत्या मॅचमेकर्सनी जुळवलेली असायची. यांच्याकडे भावी नवरा-नवरींचा 'डेटाबेस' एका पोथडीत लिहिलेला असायचा. त्यांच्या जन्म-कुंडल्या जपून ठेवलेल्या असायच्या. तो 'डेटाबेस' चांगलाच मोठा आणि विश्वासार्ह असायचा. आणि त्या डेटाबेसवर आई-वडिलांचा गाढा विश्वास असायचा. ती माहिती कधीही चुकीची नसायची. वयात आलेल्या आपल्या मुलीचं लग्न करायचं ठरवलं कि सर्वात आधी तो बाप या मॅचमेकर्सना येऊन भेटायचा. माहिती आणि जन्म-कुंडली त्यांना सोपवून निर्धास्त होऊन परत जायचा. जणू आपली जबाबदारीच त्यांच्या खांद्यावर टाकून परतायचा. इतका या लोकांवर त्यांचा विश्वास होता. एकदा का माहिती दिली कि सहा महिन्यात लग्नाचा बार उडणारच हा अनुभव होता. आणि यांनी ठरवलेली लग्ने आजवर, कितीतरी वर्षे झाली तरी आनंदात टिकून होती. नवरा-नवरी सुखाने नांदत होते. त्यांचा ‘सक्सेस रेट’ हंड्रेड परसेन्ट होता.


लग्न लवकर जुळायचं आणि ते आयुष्यभर टिकायचं याचं अजून एक कारण होतं. जुन्या काळात वडील कामाला जायचे. आई घर सांभाळायची. महिन्याला 'पगार' मिळायचा. त्या इवल्याशा पगारात भलीमोठी एकत्रीत कुटुंबेही सुखासमाधानात नांदायची. पण त्या नांदण्यामागे आईचा फार मोठा हातभार असायचा. कधीही न दिसणारा. ह्या तुटपुंज्या पगारात घर चालवणं हि तारेवरची कसरत आहे हे त्या कमावत्या माणसालाही कळायचं नाही. आई, एका फायनान्स मॅनेजरलाही लाजवील ह्या खुबीने घरातील जमाखर्च ठेवायची. काही कमीजास्त झालं तर सांभाळून घ्यायची. कधी कधी वडील रागावले, ओरडले तर गुपचुपपणे त्यांचं ऐकून घ्यायची. 'कॉम्प्रो' करायची. 'लेट गो' करून हसत-हसत पुढच्या क्षणाला आपल्या ओंजळीत पकडायची.


यात काही कमीपणा आहे किंवा यानं माझं ‘स्त्रीत्व’ धोक्यात आलं आहे किंवा माझ्यावर कोणी वर्चस्व गाजवत आहे असं तिला कधीच वाटायचं नाही. का? ति स्वाभिमानी स्त्री नव्हती? तिला आपल्या हक्काची जाणीव नव्हती? तिला भावना नव्हत्या? ती अडाणी होती? नाही. तिला हे सगळं कळायचं. पण कुठे 'कॉम्प्रो' करायचा, कुठे 'लेट गो' करायचं हे ती जाणून होती. "व्हॉट इज ऍट स्टेक?" हे तिला चांगलंच माहिती असायचं. आपल्या कुटुंबाचं हित हे आपल्या ‘इगो' पेक्षा जास्त महत्वाचं आहे हे ती माउली जाणून होती. आणि असं करून आपण काही भला मोठा त्याग वगैरे करतो आहोत हा वृथा अभिमानही तिच्या मनाला कधी शिवायचा नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्यामुळेच हा संसार आनंदात सुरु आहे याचीही तिला सार्थ जाणीव होती. पण कुणाकडूनही याचं 'सर्टिफिकेट' मिळवायची आवश्यकता तिला भासली नाही. तिच्या नवऱ्याचं, मुलांचं, संसाराचं भलं हेच तिच्यासाठी फार मोठं 'सर्टिफिकेट' होतं.


आईच्या स्वयंपाकघरात वडील ढवळाढवळ करायचे नाहीत आणि वडिलांच्या कामात आई. प्रत्येकाचं क्षेत्र ठरलेलं होतं. महत्वाचे निर्णय घेण्यासाठी वडील हे घरातले "लीडर" आहेत हे आईनं मान्य केलं होतं. तिचा त्यांच्यावर अतीव विश्वास होता. आपल्या कुटुंबासाठी ते योग्य निर्णय घेतील याबद्दल तिला तिळमात्र संदेह नव्हता. याचा अर्थ हा नव्हे कि ती निर्णय घेण्यात असमर्थ होती. फक्त तिने हा हक्क आपण होऊन आपल्या नवऱ्याला दिला होता. या अशा वातावरणात तेंव्हाच्या मुली वाढल्या होत्या. संसार कसा चालवावा लागतो, त्यासाठी काय करावं लागतं याचं बाळकडु त्यांना आईकडून मिळालं होतं.


त्या काळात मुली शिक्षित होत्या पण बऱ्याचजणी नौकरी करीत नव्हत्या. त्यांच्या जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा फार माफक होत्या. लग्न झाल्यावर 'हाऊसवाईफ' चा रोल करायला त्या आनंदात तयार होत्या. चालून आलेल्या स्थळातून कोणता जोडीदार निवडायचा याचा निर्णय पालक किंवा घरातली मोठी माणसे घ्यायची. मुलींचीही त्याला अनुमती होती. आई-वडील ठरवतील त्या मुलाशी लग्न करायला त्या तयार असायच्या.


पण गेल्या वीसेक वर्षात समाजात अमुलाग्र परिवर्तन झालं आहे. सामाजिक परिस्थिती झपाट्याने बदलली आहे. आज समाज विखुरला आहे. एकत्र कुटुंब पद्धतीचा ऱ्हास होऊन, न्युक्लिअर कुटुंब तयार झाली आहेत. त्यात भर म्हणजे आई-वडील दोघेही नौकरी करत आहेत. आई-वडिलांकडे मुलांना द्यायला पुरेसा वेळ नाही. वेळेअभावी मित्र नाहीत. जे थोडेफार आहेत ते आपापल्या कुटुंबात, कामात व्यस्त आहेत. नातेवाईकांना 'जिवलग' म्हणावे का हा प्रश्न आहे. यात भर म्हणजे प्रचंड मोठ्या वेगाने, आर्थिक प्रगती झाली आहे. 'मासिक पगार' हि संकल्पना जुनी होऊन तिची जागा आता 'ऍन्यूअल पॅकेजने' घेतली आहे. ज्याला ऍन्यूअल पॅकेजचं स्पेलिंगही लिहिता येत नाही अशा येऱ्या गबाळ्यालाही आता ऍन्यूअल पॅकेज मिळायला लागलं आहे. लोकांना त्यांच्या वैयक्तिक क्षमतेपेक्षा, कौशल्यापेक्षा जास्त पैसा मिळायला लागला आहे. यामुळे प्रत्येकालाच आपण बिल गेट्स नाहीतर अंबानी झाल्याचा भास होत आहे. या पैश्याचा माज त्यांच्या वागण्या-बोलण्यातून पदोपदी ओसंडून वाहतो आहे. हि आजची वस्तुस्थिती आहे. दारुण आहे पण खरी आहे.


आज बहुतांश मुली नौकरी करत आहेत. मुली मुलांइतकंच पॅकेज कमावत आहेत. कधी कधी तर मुलींचं पॅकेज मुलांपेक्षाही जास्त आहे. यामुळे मुलींमध्ये 'इगो' बळावला आहे. मीही कमावते, आणि मी तुझ्यापेक्षा तसूभरही कमी नाही हा न्यूनगंड वाढत चालला आहे. दरवर्षी वाढत चाललेल्या पॅकेजच्या आकड्याबरोबरच इगोही फुगत चालला आहे. प्रत्येक गोष्टीत एकमेकांची तुलना होते आहे. या पॅकेजमुळे आर्थिक स्वातंत्र्य मिळालं आहे. मुली आपल्या पायावर खंबीरपणे उभ्या आहेत. पण त्या आर्थिक स्वातंत्र्यामुळे, 'मी जन्मभर एकटा किंवा एकटी राहू शकते आणि मला कोणाचीच गरज नाही,' हा वृथा अभिमान डोक्यात गेला आहे. यामुळे जोडीदाराबद्दल त्यांच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या आहेत. या अपेक्षांची सुची खूप लांब आहे. कधी कधी ती अतर्क आहे. अनाकलनीय आहे. जोडीदाराचा शोध घेतांना पहिला फिल्टर 'पॅकेजचा' आहे. वीस लाखापेक्षा जास्त पॅकेज असेल तरच पुढचं बोलणं होत आहे. भावी आयुष्याची सुरुवातच पॅकेजच्या किंमतीवर ठरत आहे. मुलींना स्वतःच्या मालकीचं घर असलेला मुलगा पाहिजे आहे, पण त्या घरात त्याचे आई-वडील राहत नसावेत हीही अट आहे. अटींवर कोणालाही 'कॉम्प्रो' करायचं नाहीये. अटी थोड्यादेखील शिथील करायला त्या तयार नाहीत. आणि यातच लिव्ह-इन सारख्या संकल्पनेने आगीत तेल टाकायचं काम केलं आहे. फक्त शारिरीक सुखासाठी लिव्ह-इनचा उपभोग आणि उपयोग सर्रास होत आहे. एकाच वर्षात कंटाळून पुन्हा पार्टनर बदलले जात आहेत. या अशा बिकट परिस्थितीत विश्वास कोणावर ठेवावा आणि जोडीदार कसा शोधावा हा खरा यक्षप्रश्न आहे.


यात भर म्हणजे ऑफिसप्रमाणे घरातही मुलींना 'लीडर' व्ह्ययचं आहे. हि चांगली गोष्ट आहे. त्यांनी जरूर लीडर व्हावं पण मॅनेजमेंटचं महत्वाचं प्रिंसिपल हे आहे कि 'देअर कॅन ओन्ली बी वन लीडर.' लीडर व्हायचं असेल तर मग तसाच जोडीदार शोधायला हवा जो तुम्हाला लीडरशिप बहाल करेल, मग भलेही त्याचं पॅकेज शुन्य असेल तरी चालेल. आहे तयारी याची? पण हेही यांना नको आहे. जोडीदार शिकलेला हवा. पॅकेज गडगंज हवं. आपल्या स्टेटसला साजेसा हवा. मग त्याचाही 'इगो' तुम्हाला सांभाळावा लागणारच. 'कॉम्प्रो' करावं लागणारंच. 'यु कान्ट ह्याव युअर केक अँड ईट इट टू.' सगळंच आपल्या मनासारखं कधीच होत नसतं. हा जीवनाचा नियम आहे.


इथे प्रश्न मुलींचा अथवा मुलांचा नाहीए. मुलांचीही अवस्था हीच आहे. दोघेही याच जाळ्यात अडकलेले आहेत. दोघांनाही यातून मार्ग मिळत नाहीए. कारण त्यांना मार्ग शोधायचा नाहीए. 'मी म्हणेल ती पूर्वदिशा' हा त्यांचा अट्टाहास आहे. मुली नौकरी करत आहेत यामुळे हि समस्या झाली असंही नाही. जुन्या काळातही मुली नौकरी करायच्या. त्यांचीही लग्न व्हायची. टिकायची. पण त्यांच्या 'प्रायोरिटी'मध्ये कुटुंब सर्वात वर असायचं. त्या जुन्या मुशीत वाढलेल्या असल्यामुळे त्यांना 'कॉम्प्रो' करायला 'इगो' आडवा यायचा नाही. पण आज मुलगा असो कि मुलगी असो त्यांच्या 'प्रायोरिटीज' पूर्णतः भिन्न आहेत आणि त्याबरोबरच कोणालाही थोडादेखील 'कॉम्प्रो' करायचा नाहीए. आणि हीच खरी या लग्नामागची व्यथा आहे. नौकरीने आर्थिक स्वातंत्र्य नक्कीच वाढलं आहे पण त्याबरोबर 'इमोशनल कोशंट' कमी झाला आहे. एकमेकांना समजून घ्यायची क्षमता दिवसेंदिवस कमजोर होत चालली आहे.


तरुण मुली मुलांनी, पानटपरीवर उभं राहून सिगारेटचा झुरका घेत, "कॉम्प्रो, इगो आणि लिव्ह-इन" या विषयावर डिबेट केली तर याचं सोल्युशन नक्कीच मिळेल अशी माझी खात्री आहे.




 
 
 

Comments


Stay updated and enhance your wisdom about wealth creation

Thanks for subscribing!

bottom of page