गोष्ट दहा करोडची
- Wing Commander Pravinkumar Padalkar

- Apr 8, 2023
- 3 min read
परवा गप्पा मारतांना माझ्या एका मित्राने मला विचारलं,"स्टॉक मार्केटमधून किती पैसे कमावता येतील?" मी म्हणालो, "जितकी जास्त वर्षे गुंतवणूक, तितके जास्त पैसे." हे ऐकून तो म्हणाला, "जास्त वर्षे गुंतवणूक म्हणजे किती वर्षे?" मी म्हणालो, "तुला जितकी जास्त वर्षे करता येईल तेवढी." मग चर्चा बाजारातील संभाव्य धोके, लोकांचं होणारं नुकसान, त्यांचा गुंतवणुकीकडे पाहायचा दृष्टीकोन, वागणूक याकडे वळली.
बहुतेक लोकांचा स्टॉक मार्केटबद्दल खूपच गैरसमज असतो. कोणाला तो सट्टा वाटतो. कोणाला त्यात फार मोठी जोखीम दिसते. कोणाला झटपट पैसे मिळवण्याचं ते एक साधन वाटतं. प्रत्येक जण आपापल्या ऐकीव माहितीवरून आपले मत बनवतो. त्या मताप्रमाणे मग हे लोक स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणूक करतात किंवा त्यापासून दूर राहतात.
स्टॉक मार्केटमध्ये पहिल्यांदा गुंतवणूक करणारे सर्वजण बहुदा मित्रांच्या सांगण्यावरूनच गुंतवणूक करतात. ह्या मित्रांनीही दुसऱ्या कोणाच्या सांगण्यावरून कोणत्यातरी कंपनीचे शेअर खरेदी केलेले असतात. यात त्यांना केवळ नशिबानेच थोडाफार फायदा झालेला असतो. आणि ते मग स्वतःला स्टॉक मार्केटचा जाणकार समजू लागतात. हि अशी साखळी सुरु होते. पण अश्या ऐकीव माहितीवर आधारित शेअर खरेदी करून शेवटी व्हायचं तेच होतं. काही दिवसातच ते शेअर जोराने कोसळतात आणि यांना फार मोठा तोटा सहन करावा लागतो. तसा तोटा झाला कि हे लोक पुन्हा स्टॉक मार्केटकडे वळून पाहात नाहीत. मग आयुष्यभर स्टॉक मार्केटला दोष द्यायला मोकळे होतात.
खरंतर चूक त्यांचीच असते. त्यांना स्टॉक मार्केटमध्ये पैसे कसे गुंतवायचे याचं ज्ञान नसतं. आणि जाणकार व्यक्तीचा सल्ला न घेता ते हि कृती करून बसतात. पण ह्याच व्यक्ती जेंव्हा शंभर रुपयाची भाजी खरेदी करायला जातात तेंव्हा सगळ्या चौकशा करून, मोलभाव करून, निवडून भाजी घेतात. पण एक लाख रुपयांचे शेअर खरेदी करतांना हा सारासार विचारही ते करत नाहीत. आणि हेच त्यांच्या तोट्यामागचं कारण असतं. हि तोटा झालेली माणसं मग इतर सगळ्या लोकांना स्टॉक मार्केटबद्दल नकारात्मक गोष्टी सांगत फिरतात.
यापेक्षा पुढचं पाऊल म्हणजे काही लोक इंट्राडे ट्रेडिंग आणि फ्युचर-ऑपशन्स सारख्या अत्यंत जोखमीच्या व्यवहारातही पैसे लावतात. त्यांना यातील धोक्याची सूतराम कल्पना नसते. तरीही इतर लोकं पैसे लावतात म्हणून त्यांचं बघून हेही पैसे लावतात आणि मग सारे पैसे गमावून बसतात. मी अशा कितीतरी लोकांना वैयक्तिकरित्या जाणतो ज्यांनी लाखो रुपयांची पुंजी फ्युचर-ऑपशन्स मध्ये लावून गमावलेली आहे.
एखाद्या कंपनीचा शेअर खरेदी करणे हि वाटते तितकी सोपी बाब नव्हे. त्यासाठी त्या कंपनीच्याबाबतीत खूप अभ्यास करावा लागतो. खूप माहिती गोळा करावी लागते. वेळ द्यावा लागतो. त्या नंतरच ती कंपनी गुंतवणूक करण्यासाठी योग्य आहे कि नाही हे ठरवता येते. पण योग्य कंपनीचा शेअर खरेदी केल्यावरदेखील तीत अपेक्षित वेळेत हवा तितका नफा होईलच याची शाश्वती नसते. कारण कंपनीच्या शेअरमध्ये केलेल्या गुंतवणूकीत फार मोठी जोखीम असते. कोणती ना कोणती घटना घडते आणि शेअरचे भाव गडगडतात. त्याबरोबरच बाजारात सतत उतार-चढाव होत राहतो. यामुळे तुम्ही घेतलेल्या शेअरची किंमत पन्नास टक्क्यांहून अधिक कमी होऊ शकते. हा तोटा सहन करणे सामान्य गुंतवणूकदाराला शक्य होत नाही.
पण स्टॉक मार्केटमध्ये पैसे कमावण्याचा दुसरा सहज मार्ग आहे आणि तो म्हणजे म्युच्युअल फंडात निवेश करणे. म्युच्युअल फंडातही जोखीम असते पण ती शेअरच्या तुलनेने कमी असते. जर आपण दर महिन्याला म्युच्युअल फंडात काही पैसे गुंतवत राहिलो आणि हि गुंतवणूक दीर्घ कालावधीसाठी सुरु ठेवली तर त्यात नुकसान होण्याची शक्यता अजूनच कमी होते. जर दीर्घ कालावधीसाठी अशी गुंतवणूक सुरु ठेवली तर कंपाऊंडिंगद्वारे मोठ्या प्रमाणात संपत्ती जमा होऊ शकते. म्युच्युअल फंडाचा हा फार मोठा फायदा आहे.
एका सामान्य माणसासाठी दहा करोड रुपये हि खूप मोठी रक्कम आहे. परंतु स्टॉक मार्केटमधून दहा करोड रुपये कमावणं शक्य आहे. जर तुम्ही दर महिन्याला म्युच्युअल फंडात बारा हजार रुपये गुंतवले आणि त्यात दर वर्षी फक्त दहा टक्क्यांनी वाढ केली तर तीस वर्षांनी तुमच्याकडे दहा करोड रुपये जमा होऊ शकतात. हा इतका सोपा मार्ग आहे. यालाच कंपाऊंडिंग म्हणतात. आईन्स्टाईनने कंपाऊंडिंगला जगातले आठवे आश्चर्य म्हटले आहे ते यामुळेच.
पण यात दडलेली महत्वाची बाब हि कि तुमच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार योग्य म्युच्युअल फंड तुम्हाला निवडता आले पाहिजेत. आज बाजारात दोन हजार पाचशे पेक्षा अधिक म्युच्युअल फंड स्कीम आहेत. त्यातून आपल्यासाठी योग्य स्कीम निवडणे हे खूप अवघड काम आहे. म्हणूनच गुंतवणूक करतांना तुम्ही ज्याला ओळखता, ज्याच्याशी तुम्ही बोलू शकता, भेटू शकता अशा प्रामाणिक, नैतिक आणि विश्वासार्ह म्युच्युअल फंड वितरकाची (डिस्ट्रिब्युटरची) मदत घेणे गरजेचे आहे.
हे इतकं सोपं आहे कि बऱ्याच जणांचा यावर विश्वासच बसत नाही. पण हे खरं आहे. हे अशक्य नक्कीच नाही. तुम्हीही म्युच्युअल फंडातून सहजपणे दहा करोड रुपये कमावू शकता. गरज आहे ती फक्त बाजारातील चढ-उताराकडे ध्यान न देता ठरवलेली गुंतवणूक दीर्घ कालावधीसाठी सुरु ठेवण्याची. ह्यासाठी दोनच गोष्टींची आवश्यकता आहे आणि त्या म्हणजे संयम आणि दृढ निश्चय.
दहा करोडची हि गोष्ट खरी आहे. साधी, सोपी आणि सरळ आहे!!!
(अस्वीकरण:- म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे, सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचूनच गुंतवणूक करणे )
.png)



Comments