शेजाऱ्याची बायको!
- Wing Commander Pravinkumar Padalkar

- Jan 7, 2023
- 3 min read
कधी कधी आकाशात सूर्य असतांनाही अचानक इंद्रधनुष्य दिसावं तश्या काही जुन्या आठवणी अनपेक्षितपणे समोर येऊन उभ्या राहतात. एकदम झळाळून. परवा असंच झालं. माझा एक मित्र आहे, अमीत. त्याने मी सुचविलेल्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली आहे. त्याला गुंतवणूक करून अजून एक वर्षही झालेले नाही. तो त्याच्या गुंतवणुकीबाबत समाधानी आहे. त्यामुळे त्याने त्याच्या मित्राला, सुरेशला माझ्याकडे गुंतवणुकीसाठी पाठविले.
अमीतच्या सांगण्यावरून तो मला भेटायला आला. एक तासभर मी त्याला म्युच्युअल फंडातले संभाव्य धोके, ते कमी करावयाचे पर्याय आणि माणसाची गुंतवणुकीबाबतीत असलेली वागणूक (investing behavior) याबाबत समजावून सांगितलं. हे माझे उपदेशाचे पोक्त डोस ऐकून शेवटी तो मला म्हणाला, "सर, मी म्युच्युअल फंडमध्ये काही पैसे आधी गुंतवलेले आहेत आणि माझा परतावा (return) अमीतपेक्षा बराच जास्त आहे. त्यामुळे तुम्ही अशी गुंतवणूक सांगा कि माझा परतावा अमीतपेक्षा जास्तच राहील."
भला उसकी साडी मेरी साडीसे सफेद कैसे?
हे एकताच अचानक मला ऐंशीच्या दशकातली "भला उसकी साडी मेरी साडीसे सफेद कैसे?" ही जाहिरात आठवली आणि मनात हसू आलं. दुसऱ्यांशी प्रत्येक बाबतीत तुलना करायच्या मानवी मनाच्या सवयीचा या जाहिरातीने फार खुबीने उपयोग करून घेतला होता. त्या काळात टीव्हीवर हि जाहिरात फार गाजली होती.
खरंतर हि तुलना करायची द्वाड खोड आपल्याला लहानपणापासूनच लागलेली आहे. अगदी शाळेत असल्यापासूनच. शाळेत असतांना याला माझ्यापेक्षा कमी गुण आणि त्याला जास्त गुण, हा वर्गात पहिला तर तो शेवटचा हे गणित सुरू होतं. शाळेतल्या गुणांवरून सुरु झालेलं हे आयुष्याचं समीकरण मग नौकरी, त्यातलं पद (designation), पगार (ज्याला आजच्या बोली भाषेत पॅकेज म्हणल्या जातं), दोन बेडरूम कि तीन बेडरूमचा फ्लॅट? असं तुलनात्मक मार्गक्रमण करण्यातच संपून जातं. आयुष्याच्या शेवटापर्यंत हि सवय मनात खोल रुतून राहते. जाता जात नाही. सुटता सुटत नाही. आधे-मधे, कुठे-कुठे, कधी-कधी ती अशी उफाळून बाहेर येतेच येते.
सुरेशचंही असंच होतं. त्याला मनात हि भिती सतावत होती कि त्याचा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ सध्या अमीतपेक्षा जास्त परतावा देत आहे तर तो माझ्या सल्ल्यामुळे कमी तर होणार नाही ना? मनात असे प्रश्न उभे राहणं हे साहजिकच आहे. ते असावेच. त्याची हि भीती, शंका अनाठायी नव्हती. पण तिचा उगम हा जिज्ञासेपोटी नव्हता तर तुलनेपोटी झाला होता. त्यात मला किती परतावा मिळेल यापेक्षा माझा परतावा दुसऱ्यापेक्षा कमी होणार नाही ना हि चिंता दडलेली होती. त्यामुळे ह्या भीतीचं समूळ उच्चाटण करणं आवश्यक होतं.
पुढे आमचं जे संभाषण झालं ते असं:-
मी त्याला विचारलं, "अमीतचा सध्या फायदा किती झाला आहे आणि तुझा किती?"
तो म्हणाला, "सर, अमीतचा बारा हजार आणि माझा पंच्याहत्तर हजार."
मी म्हणालो, "तू गुंतवणूक कशी केली? सिप कि लमसम?"
"सिप."
"मग तू XIRR रिटर्न सांग." ते त्याला काही सांगता आलं नाही.
मी त्याला पुन्हा विचारलं, "तू किती दिवसांपासून गुंतवणूक करतो आहेस?"
तो म्हणाला, "तीन वर्षांपासून."
मी पुन्हा विचारलं, "कोव्हीड आधीपासून कि नंतर?"
तो म्हणाला, "आधीपासून."
या एका उत्तरातच साऱ्या प्रश्नांचं उत्तर दडलं होतं.
मग पुढचा एक तास मी त्याला परताव्याचं गणित तपशीलवार समजावून सांगितलं.
शेजाऱ्याची बायको
खरंतर दोन पोर्टफोलिओ संपूर्णपणे सारखे नसतील आणि एकाच दिवशी विकत घेतले नसतील तर ते कधीच एकसारखा परतावा देत नाहीत. त्यामुळे दोन वेगवेगळ्या गुंतवणूकदारांचे पोर्टफोलिओचे परतावे हे वेगळेच असणार हि साधी सरळ बाब आहे.
जरी दोन म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ एकसारखे असतील पण त्यांच्या गुंतवणुकिचे कालावधी निराळे असतील तरीही दोन्हीचा परतावा हा वेगळाच मिळणार.
पण तुलनेच्या भरात त्याला बहुदा हे कळलं नसावं. सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा कि कोव्हिडच्या आधीपासून ज्यांनी सिप करायला सुरुवात केली त्यांना भरगोस परतावा मिळाला आहे. कारण कोव्हीडमुळे त्यांची खरेदी किंमत अतिशय कमी भावात झालेली आहे. त्यामुळे हा जो अधिक परतावा त्यांना दिसतो आहे त्यात नशिबाचा भागच जास्त आहे.
या भरगोस परताव्याचा दुसरा पैलूही समजून घेणे इथे आवश्यक आहे. आपल्या वैयक्तिक आयुष्यात जसे कधी चांगले तर कधी वाईट दिवस येत राहतात, त्याचप्रमाणे बाजारातही कधी चांगला परतावा मिळतो तर कधी तोट्याचा सामनाही करावा लागतो. सगळेच दिवस कधीच सारखे नसतात.
मागच्या एका वर्षात ज्यांनी गुंतवणूक सुरु केली आहे त्यांच्या पोर्टफोलिओचे परतावे सध्या तर तोट्यातच आहेत. याचं कारण म्हणजे मागील एका वर्षात बाजार ना वर गेला आहे ना खाली गेला आहे. तो एकाच पातळीवर खाली-वर जात फिरत आहे.
पुढचं एक वर्ष हे जागतिक महागाई, मंदी यांनी ग्रासलेलं असणार आहे. त्यामुळे आज ज्यांचा परतावा चांगला दिसत आहे तो पुढे चालून कदाचीत दिसणारही नाही.
त्यामुळे पुढील तीन वर्षांनी अमितचा परतावा सुरेशहून जास्त झाला तर त्यात आश्चर्य वाटायला नको आणि तुलना तर नकोच नको.
एक जुनी चायनीज म्हण आहे, "Your neighbour’s wife looks prettier than your own.”
"आपल्या बायकोपेक्षा शेजाऱ्याची बायको चांगलीच दिसते."
आपल्या पोर्टफोलिओचंही अगदी असंच असतं!
.png)



Comments