top of page

काळे करडे कवडसे

मानवी स्वभाव हा एक गूढ चमत्कार आहे. या स्वभावाचे नानाविध कांगोरे आहेत. अन हरेक कांगोरा विविध रंगांनी नटलेला आहे. सजलेला आहे. एखाद्या रंगबिरंगी चित्रासारखा. कधी मोरपंखी, कधी इंद्रधनुषी, कधी लखलखीत झळाळता तेजस्वी. तर कधी काळा, करडा, अतरंगी. कधी असा, तर कधी कसा.


तिशीत पोहोंचता पोहोंचता ढोबळ मानाने प्रत्येकाच्या स्वभावाचा अंतरंग कमी जास्त प्रमाणात ठरून गेलेला असतो. हा स्वभाव घरातील संस्कार, मित्र-मैत्रिणी, स्वतःला आलेले अनुभव किंवा मग कधी कधी पूर्वजन्मीचे संचित यानुरुप घडत जातो. कालानुरूप हा स्वभाव आपल्या दैनंदिन वागणुकीत पूर्णतः मुरून जातो अन मग तो बदलणं फारच कठीण होऊन बसतं. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही असं.


प्रत्येकाच्या स्वभावाचा हा असा ठसा ठरलेला असला तरी कोण कधी कसा वागेल हे काही सांगता येत नाही. अन मग आपण आपल्याला आलेल्या अनुभवांवरून त्यांना चांगला माणूस, बरा माणूस, वाईट माणूस असे लेबल लावून मोकळे होतो. अन असं लेबल एकदा चिकटवल्यावर आपल्यालाही ते बदलणं कठीण होतं. त्या त्या रंगाच्या चष्म्यातूनच आपण त्यांना जोखतो, पारखतो. अन त्याप्रमाणेच त्यांच्याशी वागतो. हा असाच आहे, तो तसाच आहे हे जवळजवळ निश्चित झालेलं असतं. आपल्या मनावर अनामिकपणे इतरांच्या या अशा वागणुकीची स्वभावछाया गडद होत जाते. आपलं मन कलुषित करते. आपण आपल्याला आलेल्या अनुभवातून हा असा निष्कर्ष काढतो. अन तो काही केल्या आपण बदलायला तयार नसतो. एकदा का ते “काळे करडे कवडसे” आपल्या मनावर दाटले कि आपण त्याच रंगात त्या त्या व्यक्तींना जोखत राहतो. आयुष्यभर. जोपर्यंत हे काळे करडे कवडसे उडून जाऊन त्याजागी मोरपंखी रंग लागत नाही तोपर्यंत.


माणसातला स्वार्थीपणा, मीपणा हा यापैकीच एक अंतरंग. मी, मी आणि फक्त मी. माझ्याशिवाय दुसरं काहीच नाही. कोणत्याच इतर नात्याला इथं थारा नाही. कोणाचाच संबंध नाही. ना आई ना बाप. ना नवरा ना बायको. फक्त मी आणि माझं जग. या मीच्या वर्तुळात अडकलेल्या स्वमग्न माणसांचा हा स्वभाव. आपण प्रत्येकानेच खचितच असे अनेक स्वार्थी लोक पाहिले असतील. अनुभवले असतील. त्यांच्याशी कोणाचा दुरून तर कोणाचा जवळून ऋणानुबंध आला असेल. अन त्यांचा हा असा स्वभाव बघून, तुम्हालाही प्रश्न पडला असेल कि माणूस इतका आपमतलबी होऊ शकतो? माणसं अशीही वागु शकतात? अशी कशी वागु शकतात? का वागतात?


माझ्या मनावर उमटलेले हे "काळे करडे कवडसे.” अशाच व्यक्तींचे. दिसले तसे. अनुभवले तसे. वाटले तसे. भासले तसे. त्यांचे रंग चांगले कि वाईट? कोण जाणे? हे ठरवणारा मी कोण? मी फक्त शब्दांचा एक निःशब्द चित्रकार. केवळ एक निरीक्षक. Just an observer.


पण आयुष्यात मधून मधून हे असे काळे करडे कवडसे डोकावतात, डोकावत राहतात आणि त्यामुळेच मनात झळाळत्या मोरपंखी सौन्दर्याची आस अबाधित राहते.


१. पिझ्झा

२. हनिमून

३. साईबाबा

४. न्याय

५. व्हिडीओ कॉल

६. बॅनर


या सहा काळ्या करड्या कवडश्यांनी रेखलेलं माझं नवीन पुस्तक "काळे करडे कवडसे" लवकरच प्रकाशीत होत आहे. आपणास नक्कीच आवडेल. आवडावं हि आशा.

 
 
 

Recent Posts

See All
नाचणाऱ्या नवदुर्गा

शहर का तब्दील होना शाद रहना और उदास रौनक़ें जितनी यहाँ हैं औरतों के दम से हैं ।

 
 
 

Comments


Stay updated and enhance your wisdom about wealth creation

Thanks for subscribing!

bottom of page