साडेसाती : एक वरदान कि दुःषाप
- Wing Commander Pravinkumar Padalkar
- Oct 21, 2023
- 4 min read
मी शाळेत शिकत असतांना आणि मग पुढे कॉलेजात जात असतांनाची ही गोष्ट. गोष्ट एकदम खरी. काल्पनिक कथा वगैरे नव्हे. मी माझ्या डोळ्याने पाहिलेली. अनुभवलेली. अमेयची. माझ्या मित्राची. तेंव्हाचा मित्र. आता तो माझ्या संपर्कात नाही. पण मी त्याला अजूनही विसरलेलो नाही. जेंव्हा-जेंव्हा नशीब, लक, डेस्टिनी, साडेसाती ह्या विषयावर मित्रात वादविवाद होतात, चर्चेला उधाण येतं तेंव्हा-तेंव्हा हमखास त्याचा देखणा चेहरा माझ्या नजरेसमोर उभा राहतो. आणि आपसूक का कोण जाणे मी भूतकाळात पोहोंचतो. मला माझ्या घरासमोरचं त्याचं घर दिसतं. अमेयची आई दिसते, बाबा दिसतात, त्याची बहीण दिसते. नियती इतकी क्रूर अन मग्रुर होऊ शकते यावर माझा विश्वास बसत नाही. अजूनही बसत नाही. पण मी जे डोळ्यांनी समोर घडतांना बघितलं त्याला मी स्वप्न तरी कसं म्हणु? असं होऊ शकतं? असंही होऊ शकतं? यावर माझा विश्वास बसत नाही. आणि नशिबावर, नियतीवर श्रद्धा नसतांनाही तिचं आस्तित्व नाकारायला मी धजावत नाही.
अमेय माझ्या घरासमोरच राहायचा. अगदी शंभर पावलावर. वडील सरकारी नोकरी करायचे. आई घर सांभाळायची. आमच्या त्या संपूर्ण गल्लीत हे एक सुखवस्तु कुटुंब होतं. चौघांचं. हे चारही जण गल्लीतील इतर सर्वांपेक्षा वेगळे दिसायचे. एकदम सुंदर. गोरे गोमटे. प्रकाशमान. त्यांचं घरही एकदम नीटनेटकं ठेवलेलं असायचं. मी जेंव्हा जेंव्हा खेळायला, वाढदिवसाला त्यांच्याकडे जायचो, तेंव्हा तेंव्हा मला त्या घरातला आनंद, ऊर्जा, उल्हास जाणवायचा. मला त्या घराचं फार अप्रूप वाटायचं. त्या घरात कशाचीच उणीव नव्हती. ते एक आनंदी आणि हसतं-खेळतं घर होतं.
पुढे चालून अमेयने इंजिनिअरिंगला चाराऐवजी सहा वर्षे लावली. पण त्याचे वडील, आई कधी त्याला रागावले नाहीत कि त्याच्यावर ओरडले नाहीत. तोही कधी त्यामुळे दुःखी झाला नाही. मग त्याने बऱ्याच प्रयत्नाने कुठेतरी नौकरी शोधली. पण नौकरीत त्याचं मन रमलं नाही. नौकरी सोडून त्याने व्यवसाय सुरु केला. एखादा वर्ष करून बघितला. पण तेही जमलं नाही. पुन्हा नौकरी केली. पण ती टिकवून ठेवू शकला नाही. या धरसोडीत बरीच वर्षे निघून गेली. बघता बघता वडील निवृत्त झाले पण तरीही अमेय कोणत्याच नोकरीत, व्यवसायात रमू शकला नाही. त्यातच त्याच्या बहिणीचा घटस्फोट झाला. ती माहेरी निघून आली आणि पुन्हा तिने लग्न केले नाही. आज हे चारही जण एकाच छताखाली राहतात. त्या चार भिंतींना घर म्हणवत नाही. ते आताशा कसे आहेत हे मला माहित नाही. मजेत असतील असं कसं म्हणू? असतील तर छानच. असावेत याच सदिच्छा. पण एकेकाळी सुसंस्कृत, वैभवशाली, आनंदी असलेलं हे घर नियतीच्या जोरदार फटक्यांनी देशोधडीला मिळालं. यात चूक कोणाची म्हणावी? अमेयची? बहिणीची? आईची कि बाबांची? कोण जाणे? चूक कोणाचीही असो पण आयुष्याच्या या खेळात नियतीचा विजय झाला हे मात्र नक्की. यालाच बहुदा प्रारब्ध म्हणत असावेत का? कि साडेसाती? कोण जाणे? पण काही वर्षातच बघता बघता हे असं होत्याचं नव्हतं होतांना मी पाहिलं.
पण अमेयची हि एकट्याचीच गोष्ट नाही. साडेसाती मागं लागल्याची अनेक उदाहरणं मी देऊ शकतो. आपण सर्वांनीच आयुष्यात अशा कितीतरी कहाण्या ऐकल्या, पाहिल्या आहेत. आयुष्यभर कठोर मेहनत करूनही एखाद्याची झोळी रिकामीच राहते तर कोणा एखाद्याला क्षमता, कर्तृत्व नसतांनाही भरभरून दान मिळतं. हे नशिबाचे भोग कि अजून दुसरं काही?
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात नशिबाचा भाग किती? हा एक वादाचा मुद्दा आहे. इंग्रजीत नशिबालाच डेस्टिनी म्हटलं आहे. आणि डेस्टिनीचाच दुसरा अर्थ "लक" हाही होतो. नशीब म्हणा लक म्हणा कि डेस्टिनी म्हणा. नाव काहीही द्या. या तिन्हींची ढोबळ मानाने एक व्याख्या करायची असेल तर ती अशी करता येईल कि "एक अदृश्य अशी शक्ती जी तुमच्या आयुष्यातील महत्वाच्या क्षणी तुम्हाला साथ देते किंवा देत नाही.”
आस्तिक व्यक्ती याच शक्तीला देव मानतात. तर नास्तिक लोक याला "युनिवर्सल फोर्स" मानतात. नाव काहीही असो पण कोणीतरी आहे जो आपल्या आयुष्याची दिशा ठरवतो. पूर्णतः जरी ठरवत नसेल तरी महत्वाचे निर्णय घेतांना आणि मग ते तसे घेतल्यावर, त्या रस्त्यावरून चालतांना हि शक्ती सतत मदत करते. आणि या शक्तीच्या असण्यानं किंवा नसण्यानं आपण आयुष्यात यशस्वी किंवा अयशस्वी होतो. या अमोघ शक्तीने साथ दिली तर आपण नशीबवान ठरतो आणि जर हात दाखवला तर साडेसाती मागे लागते.
आयुष्यात बऱ्याच वेळेस फार महत्वाचे निर्णय घ्यावे लागतात. जसेकी कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावी, कोणती ब्रँच निवडावी, कोणत्या कंपनीत जॉब करावा, जॉब करावा कि उच्च शिक्षणासाठी परदेशात जावं, जॉब केलाच तर मग तीन वर्षांनी पुन्हा तो जॉब सोडून दुसरा घ्यावा का याच कंपनीत नौकरी सुरु ठेवावी, लग्न कोणाशी करावं? जॉब सोडून स्वतःचा व्यवसाय सुरु करावा कि नाही? एक ना अनेक. दर काही वर्षांनी असे निर्णय प्रत्येकाला घ्यावेच लागतात. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आयुष्य तुम्हाला पर्याय देतं. त्या त्या क्षणी आपल्यासमोर अनेक पर्याय उपलब्ध असतात. आणि जितके जास्त पर्याय तितकीच मनाची दोलायमान अवस्था जास्त. आणि तितक्याच प्रमाणात योग्य निर्णय घेणे अवघड. आणि जर तुम्ही या साडेसातीच्या फेऱ्यात अडकला असाल तर मग वेळीच योग्य निर्णय घेतल्या जात नाहीत आणि मग काही केलं तरीही नशिबाचे फासे उलटेच पडायला लागतात. जणु हि एक यक्ष परीक्षाच असते. आणि या अशाच अवघड समयी डेस्टिनी, नशीब, लक ह्या अदृश्य शक्तीची गरज असते.
स्टॉक मार्केटच्या गुंतवणुकीतही नशिबाचा भाग असतो. पण तो फक्त शॉर्ट टर्म ट्रेडिंग पुरताच. जर तुम्ही ट्रेडिंग करून झटपट संपत्ती कमाऊ इच्छित असाल तर त्यासाठी एकच गोष्ट आवश्यक असते आणि ती म्हणजे तुमचं नशीब. जर तुम्ही खरेच नशीबवान असाल तरच तुम्ही असं करू शकता. आणि असा फक्त लाखात एकच असतो. पण जर तुम्ही दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केली, वेळीच योग्य निर्णय घेतले आणि माझ्यासारख्या मित्राने दिलेला सल्ला मानला तर नशिबाला देखील तुम्ही मात देऊ शकता. या दूरच्या प्रवासात नशीब, डेस्टिनी, लक आपोआप तुमच्या बरोबर चालायला लागतं. संपत्ती जमा व्हायला लागते.
लॉन्ग टर्म इन्वेस्टमेन्ट ही एकच गोष्ट अशी आहे ज्यात साडेसाती हा एक दुःषाप न ठरता एक वरदान ठरते. साडेसात वर्षांपेक्षा अधिक काळ जर तुम्ही गुंतवणूक करीत राहिलात तर तुम्ही तुमचं नशीब स्वतःच लिहू शकता. तुम्हाला वेल्थ क्रिएशन साठी मग नशीब, डेस्टिनी, लक यावर अवलंबून राहावं लागत नाही. जितका गुंतवणुकीचा कालावधी अधिक तितकंच नशिबावरील अवलंबित्व कमी.
पण गुंतवणूक सोडली तर आयुष्याच्या इतर आघाडीवर मात्र हाती थोडंफार लक असणं हे नक्कीच फायद्याचं ठरतं.
मी हजारेक शब्दात हे जे पांढऱ्यावर काळं करायचा यत्न केला तेच निदा फाझली केवळ बारा शब्दात सांगून गेले.
कोशीश भी कर, उम्मीद भी रख, रास्ता भी चुन
फिर इस के बाद थोडा मुकद्दर तलाश कर ।
.png)
Comments