कहीं ज़मीन कहीं आसमाँ नहीं मिलता …
- Wing Commander Pravinkumar Padalkar

- Sep 9, 2023
- 3 min read
माझा एक मित्र आहे, समीर. नौकरी निमित्त तो पुण्यात जवळजवळ तीस वर्षांपासून राहतो आहे. आयटीमध्ये त्यानं आपलं करिअर सुरु केलं. मी वीस वर्षांपूर्वी त्याला सांगितलं होतं कि म्युच्युअल फंडात दर महिन्याला जितके शक्य होतील तितके पैसे गुंतवत जा. पण त्याने तो सल्ला कानाआड टाकला. त्याला स्टॉक मार्केटमधील गुंतवणूकीमध्ये खूप जोखीम आहे आणि आपले पैसे डुबतील याची भीती होती. म्हणून त्याने पैसे इन्व्हेस्ट केले नाहीत. शेवटी याची परिणीती हि झाली कि वयाच्या पन्नाशीत समीरकडे पाहिजे तितकी रक्कम जमा झाली नाही. आणि मग आज या गोष्टीचं त्याला राहून राहून वाईट वाटतं. वीस वर्षांपूर्वी दिलेला सल्ला ऐकला असता तर? मित्रावर थोडा विश्वास दाखवला असता तर? आज परिस्थिती वेगळी असली असती. पण हे होणे नव्हते. वेळ निघून गेली होती. इतकी वर्षे नौकरी करून देखील म्हणावी तेवढी गुंतवणूक तो करू शकला नाही याचं शल्य त्याला सलत आहे. बोचत आहे. निसटलेल्या क्षणांचं दुःख तर आहेच पण भविष्याची चिंता देखील आहे.
हि कहाणी फक्त समीरचीच नाही. आपण सगळे यातून कधी ना कधी गेलेलो आहोत. रोज जात आहोत. आयुष्याच्या वळणावर बऱ्याच गोष्टी हरवून जातात, सुटून जातात. प्रत्येकाचीच कोणती ना कोणती इच्छा म्हणा, आकांक्षा म्हणा, स्वप्न म्हणा, प्रेम म्हणा कधी ना कधी हातातून निसटलेलं असतं. मानवी आयुष्य साधं सरळ एकाच रेषेत (linear) कधीच चालत नाही. कोणाचंच चालत नाही, नसतं. प्रत्येकालाच कमी जास्त प्रमाणात धक्के खावेच लागतात. फरक इतकाच कि कोणाला आयुष्याच्या सुरुवातीला तर कोणाला नंतर. कोणाला कमी तर कोणाला जास्त. धक्के चुकत नाहीत. नसतात.
स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करतांनाही कधीकधी असे अनुभव येतात. तुम्हाला समोर दिसत असतं कि हा स्टॉक गुंतवणुकीसाठी अतिशय चांगला आहे. कंपनीचे फंडामेंटल्स चांगले आहेत, कॉर्पोरेट गव्हर्नन्स उच्च दर्जाचा आहे, व्हॅल्युएशन स्वस्त आहे. सगळ्या गोष्टी जुळून आलेल्या असतात. पण तरीही तो स्टॉक खरेदी केल्या जात नाही. मग दोन वर्षांनी जेंव्हा त्या स्टॉकची किंमत दुप्पट होते तेंव्हा हळहळ वाटून उपयोग नसतो. म्हणजे डिसिजन मेकिंग मध्ये जर थोडिही चालढकल झाली तर त्याचे परिणाम मोजावे लागतात. सगळं कळत असतं पण वळत नाही. ती वेळच तशी असते.
या निसटून गेलेल्या क्षणांचीही एक गंमत असते. ते का निसटले याची अनेक कारणं असू शकतात. बऱ्याच वेळेस आपल्याला ती गोष्ट त्या-त्या वेळी इतकी महत्वाची वाटत नाही. त्यावेळी त्या गोष्टीचं महत्व पटवून देणारा, योग्य सल्ला देणारा असा कोणीतरी शुभचिंतक भेटावा लागतो. नशिबाने तो तसा वेळेवर भेटला तरी त्याने दिलेल्या सल्ल्यावर अंमल करण्याची बुद्धी त्यावेळी व्हावी लागते. पण असंही होतं कि कोणी निकोप मनाने, प्रेमाने दिलेला सल्लाही आपण मानत नाही. मग हे प्रारब्ध नव्हे तर काय? नियतीच्या फेऱ्यात ती गोष्ट हातात येता येता ओंजळीतून वाळूच्या कणांसारखी अलगद निसटून जाते. खूप वर्षे उलटून गेल्यावर मागे वळून पाहतांना मग पश्चाताप करण्यावाचून आपल्या हातात काहीच उरत नाही.
पैसा, चांगली नौकरी, समजूतदार जोडीदार, कर्तबगार मुले ह्यातील सगळ्याच गोष्टी सगळ्यांनाच मिळतील असं नाही. असं फार क्वचितच घडतं. आणि ज्यांना त्या लाभल्या तेच खरे भाग्यवंत. त्यांनी रोज सकाळी उठावं आणि आपला दिवस फक्त “अटीट्युड ऑफ ग्रॅटिट्यूड” मध्ये घालवावा. बस्स इतकंच! पण अशा भाग्यवान लोकांनाही, नियतीने आपल्या पदरात किती मोठं दान टाकलं आहे हे कळत नाही. यापेक्षा मोठं दुर्दैव ते काय ?
पण ज्यांना या चारी पैकी एखादी गोष्ट जरी मिळाली नसेल असं वाटत असेल तर त्याने त्याचा इतका त्रास करून न घेता जे आहे ते ऍक्सेप्ट करून पुढे चालत राहावं. आयुष्यात एखादी गोष्ट मिळाली नाही तर त्यामुळे दुःखी होऊन पश्चाताप करण्यात अर्थ नाही. पश्चाताप करणे हा यावरचा तोडगा नव्हे. तर त्या वेळी आपण तो सल्ला मानायला हवा होता हे कबुल करणे यातच भविष्यातील आनंद लपलेला आहे. आणि त्याबरोबरच पुढे चालून अशा चुका कशा टाळता येतील हेही लक्षात ठेवणं तितकंच गरजेचं.
निदा फाझली यांनी यावर समर्पक भाष्य केलं आहे:-
कभी किसी को मुकम्मल जहाँ नहीं मिलता
कहीं ज़मीन कहीं आसमाँ नहीं मिलता
.png)
Comments