पन्नास लाखाची बकेट लिस्ट आणि रिग्रेट ....
- Wing Commander Pravinkumar Padalkar

- Jun 11, 2023
- 4 min read
पुलनी "पूर्वरंग" या पुस्तकात जपानचं इतकं अप्रतीम वर्णन केलं आहे कि ते पुस्तक वाचल्यावर कधी एकदा जपानला जाईन असं झालं होतं. जपानच्या साकुरानी, तिथल्या संस्कृतीने, निसर्ग सौन्दर्याने मनावर भुरळ घातली होती. दोन वर्षांपूर्वी जायचं नक्की केलं होतं. हातात व्हिसा होता, तिकीटही होतं पण कोरोनाची माशी शिंकली आणि जपानची वारी हुकली. मागच्या महिन्यांत तो योग पुन्हा जुळून आला. जपानबद्दल वाचून जे चित्र मनात उतरलं होतं त्यापेक्षा तो देश खूपच विलोभनीय आहे. भव्य ऐतिहासिक पगोडे, वळणदार सुंदर नद्या, वने, उद्याने, डोंगर, दऱ्या, समुद्र किनारे. सर्वकाही नटलेलं. निसर्गानं भरभरून दिलेला जणू वरदहस्त. जितका सुंदर देश तितकीच चांगली माणसं. सर्वांनी एकदातरी नक्कीच पाहावा असा हा देश.
जपान माझ्या बकेटलीस्टमधे बऱ्याच दिवसांपासून होतं. ते स्वप्न अशात पूर्ण झालं. अशीच प्रत्येकाची आपली आपली एक बकेटलीस्ट असते. मनात दडलेली. हात पाय धड असेपर्यंत ती पूर्ण करावी असं प्रत्येकालाच वाटतं. पण नुसतं वाटून उपयोग नसतो तर तिला साध्य कसं करायचं याचं योग्य नियोजन करणं गरजेचं असतं. पण खूप जणांच्या बकेटलीस्ट केवळ योग्य नियोजनाअभावी मनातच पडून राहतात. आणि मग त्यातूनच आपल्याला रीग्रेट वाटायला लागतो.
बकेटलीस्ट साध्य करायला दोन गोष्टींची गरज असते. एक वेळ आणि दुसरा पैसा. या दोन्हीचंही नियोजन करणं गरजेचं असतं. बकेटलीस्ट मधील कोणती गोष्ट कोणत्या वर्षी साध्य करायची आणि त्यासाठी किती पैसे लागणार ह्याचं गणित विचारपूर्वक मांडावं लागतं. ते एकदा का मांडलं कि मग बकेटलीस्ट साध्य करायला कोणतीच अडचण येत नाही.
जपान बघतांना मला हे प्रकर्षाने जाणवलं कि परदेशात खूप चालावं लागतं. पर्यटनस्थळापर्यंत गाड्या जातात पण तिथून पुढे पायीच जावं लागतं. दररोज कमीतकमी पंधरा ते वीस किलोमीटर. त्याबरोबरच छोट्या-मोठ्या टेकड्या चढाव्या लागतात. आणि यासाठी शरीरात शक्ती हवी. चालायची सवय हवी. शरीरानं साथ दयायला हवी. मुख्य म्हणजे या थोड्याफार दगदगीचा त्रास न होता पर्यटनाचा आनंद घेता यायला हवा. जर वय हातात असेल तरच हे शक्य होउ शकतं. पण जसजसं वय वाढत जातं तसतशी सहलीतील दगदग सहन होईनाशी होते आणि मग बकेटलीस्ट रितीच राहते.
जपानहून वापस येतांना सिंगापूर विमानतळावर बरीच वयस्कर जोडपी दिसली. साठी सत्तरीतली. एका टुरिस्ट कंपनीच्या आधारानं बाली, व्हिएतनाम, सिंगापूर दर्शन करून हे सर्वजण परतत होते. पण कोणाच्याच चेहऱ्यावर सुंदर, नवीन अनुभव घेतल्याचा आनंद नव्हता कि उत्साह नव्हता. सर्वजण प्रवासानं थकले होते. शरीर साथ देत नव्हतं. शक्ती कमी झाली होती. थकवा, कष्ट चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. बकेटलीस्टमधली एक इच्छा पूर्ण झाली होती. मोठ्या प्रयासाने यांनी ती साध्य केली होती. एक चेकबॉक्स टिक झाला होता. पण त्याचंही समाधान कोणाच्या चेहऱ्यावर दिसत नव्हतं. तिथे फक्त थकवा होता. दुखणं होतं. औषधं होती. एकीकडे या वयातही हे इतक्या दूरवरच्या प्रवासाला निघाले याचं मला कौतुक वाटत होतं तर दुसरीकडे त्यांचा त्रास बघवत नव्हता.
हीच सहल यांनी पाच वर्षे आधी केली असती तर? त्यांचा आनंद नक्कीच शतगुणित झाला असता. आणि इतका शारीरिक त्रासही सहन करावा लागला नसता. पण त्यांना हे कळलं नसावं का? गमतीची बाब हि कि सगळ्यांनाच हे कळतं पण वळत नाही. आणि याचं कारण हे कि आयुष्य कसं जगायचं? कशासाठी जगायचं? आणि या भूतली आपले अजून किती दिवस बाकी आहेत? या प्रश्नांचा आपण कधी गांभीर्याने विचारच केलेला नसतो.
वर्षामागून वर्षे निघून जातात. आपल्या नकळत एकेक वर्ष मागे सरत राहतं. धावत राहतं. काळ झपाट्याने पुढे निघून जातो. त्याच्या सोबत तो आपल्यालाही ओढून नेतो. जाताजाता शरीरावर तो आपल्या काळखूणा सोडून जातो. एकेकाळी काळ्याभोर असणाऱ्या केसांवर बघता-बघता चंदेरी छटा उमटायला लागते. हळूहळू तिचा आवाका वाढत जातो. चाळीशी ओलांडून पन्नाशी कधी आली ते उमजता उमजता आपण साठीत पोहोंचतो. आयुष्य डोळ्यासमोरून एखाद्या चित्रफितीसारखं झर्रर्रकन निघून जातं आणि अचानक एके दिवशी आपण रिटायर होतो.
काळाच्या या फेऱ्यात आपण इतके गुरफटून जातो कि आयुष्य आनंदात जगण्यासाठी आहे हेच विसरतो. माणूस वयाच्या साठ वर्षांपर्यंत नौकरीत व कौटुंबिक जबाबदारीत इतका गुंतून जातो कि स्वानंदासाठी चार क्षणही त्याला काढता येत नाहीत. नौकरी करून पैसे कमावणे हेच मुख्य उद्दिष्ट होऊन बसतं. पण त्या कमावलेल्या पैश्याचा वेळीच उपभोग त्याला घेता येत नाही आणि मग बकेटलीस्ट रिकामीच राहून जाते.
फुरसतीच्या म्हातारपणात मग आपल्याला शहाणपण सुचतं. स्वतःसाठी जगणं राहून गेलं याची जाणीव व्हायला लागते. आत्तापर्यंत नुसतं धावतच राहिलो पण हातात तर काहीच गवसलं नाही हे उमगायला लागतं. मागं वळून पाहतांना हे कळून चुकतं कि स्वतःला आवडणाऱ्या, मनाला आनंद देणाऱ्या बऱ्याच गोष्टी करायच्या राहूनच गेल्या. आयुष्य संपत येतांना, आयुष्याच्या सांजसमयी हि रुखरुख लागून राहते. मन उगीचच हळहळतं. सगळं काही असतांनाही काहीतरी राहून गेलं असं सतत वाटत राहतं. एक रितेपणा जाणवत राहतो. एक उणीव भासत राहते. मनाला डाचत राहते. यालाच आपण लाईफ रिग्रेट म्हणतो.
हा असा रिग्रेट राहू नये म्हणूनच आयुष्याची बकेटलीस्ट साठीत नव्हे तर विशीतच बनवायला हवी. आजच्या तरुण पिढीचं यामुळेच मला कौतुक वाटतं. नौकरी लागली की यांची बकेटलीस्ट तयार असते. बकेटलीस्ट ला फायनान्स टर्ममध्ये आपण "लक्सरीअस गोल्स" म्हणू शकू. बहुदा सर्वांच्या या बकेटलीस्टमधे विदेश पर्यटन हे असतंच. काही जणांना संपूर्ण जग फिरायचं असतं तर काही जणांना ठराविक देश बघायचे असतात. पण यासाठी पैश्याचं नियोजन करणं आवश्यक असतं. एका जोडप्याला दहा दिवसांची विदेश यात्रा करायची असेल तर साधारणपणे पाच लाख रुपये खर्च येतो. अशा दहा सहली करायच्या असतील तर पन्नास लाख रुपये लागतात. वरवर पाहू जाता पन्नास लाख हि रक्कम खूप जास्त वाटते, परंतु योग्य नियोजन केलं तर हि पन्नास लाखाची बकेटलीस्ट आपण सहजच मिळवू शकतो.
हि बकेटलीस्ट साध्य करण्याचा सरळ आणि सोपा मार्ग म्हणजे म्युच्युअल फंडात SIP करणे. जर दर महिन्याला या बकेटलीस्टसाठी तुम्ही दहा हजार रुपये SIP करत गेलात तर पंधरा वर्षात अंदाजे पन्नास लाख रुपये जमा होऊ शकतात. आणि तुम्ही तुमची बकेटलीस्ट सहजच साध्य करू शकता. हे इतकं सोपं आहे. यासाठी गरज आहे ती फक्त योग्य नियोजनाची आणि विश्वासार्ह प्रामाणिक सल्ल्याची.
तुम्ही तुमच्या बकेटलीस्टचं नियोजन केलं आहे का? नसेल तर लगेच करा. अन्यथा शेवटी रिग्रेट आहेच ...
.png)
Comments