मार्केटचा गुरुमंत्र
- Wing Commander Pravinkumar Padalkar

- Jul 9, 2023
- 2 min read
या सप्ताहात मार्केटने नवा उच्चांक गाठला. निफ्टी आणि सेन्सेक्स या दोन्हींनी नवीन शिखर पार केले. हे शिखर पार करायला त्यांना एक वर्षाहून अधिकचा कालावधी लागला. नवीन उच्चांक गाठताच वर्तमानपत्रे, टीव्ही यावर हेडलाईन झळकल्या. टीव्ही अँकर्सनी या घटनेला वाजवीपेक्षा जास्त महत्व देऊन आपला टीआरपी वाढवायचा प्रयत्न केला. गुंतवणूकदारांचा तो दिवस आनंदात गेला. त्यांना एक मानसिक समाधान लाभलं. एक दोन दिवस सर्वत्र आनंदाचं वातावरण पसरलं. प्रत्यकाने लगेचच आपापला पोर्टफोलिओ उघडून पाहिला. ज्याचा वाढला होता, तो आनंदात होता, आणि मार्केट वाढूनही ज्याचा पोर्टफोलिओ इतका वाढला नव्हता तो मात्र दुःखी होता. आपला पोर्टफोलिओ निवडण्यात सल्लागाराने चूक तर केली नाही ना, अशी शंकेची पाल त्याच्या मनात कुजबुजून गेली.
मार्केट जेंव्हा जेंव्हा वर जातं तेंव्हा तेंव्हा सर्वत्र आनंदाचं, उत्साहाचं वातावरण पसरलेलं असतं. आणि मग ज्यांनी अद्याप मार्केटमध्ये गुंतवणूक केलेली नसते असे लोक, आजूबाजूच्या लोकांचा पोर्टफोलिओ बघून गुंतवणूक करायचं धाडस करतात. नवीन डिमॅट अकॉउंट उघडले जातात, नवीन SIP सुरु होतात. जोतो मार्केटमय होऊन जातो. पानटपरीवालाही कोणता शेअर खरेदी करावा याचा सल्ला द्यायला लागतो. सगळेच अचानकपणे मार्केट एक्स्पर्ट होतात. मार्केटमधून खूप सारे पैसे मिळतील आणि आपण श्रीमंत होऊ हि भाबडी आशा बळावते. नवनवी स्वप्ने जन्माला येतात.
खरंतर मार्केटचं नवीन शिखर पार करणं हे पहिल्यांदाच होत नाही. या आधी कितीतरी वेळेस हे असंच झालं आहे. आणि पुढेही होत राहणार आहे. पण हे असं वर्षो न वर्षे घडत आलेलं असूनही आपण ते विसरून जातो. आणि दर वेळी नवीन उच्चांक झाला कि हे असंच वातावरण पाहायला मिळतं. यालाच 'हर्ड बेहेव्हिअर' असं म्हणतात.
पण या साऱ्या जल्लोषात, 'मार्केट वर गेल्यावर ते कधीही खाली जाऊ शकतं', हा अलिखित नियम आपण विसरून जातो. आणि मग मार्केट जेंव्हा जोऱ्यात गडगडतं, आणि आपला पोर्टफोलिओ पुन्हा हिरव्यातून लाल होतो, तेंव्हा आपण दु:खी होतो. मार्केटला दोष देतो. सल्लागाराला दोष देतो. आणि काहीजण तर हे नुकसान सोसू न शकल्याने मार्केटमधून कायमचेच बाहेर पडतात.
इथेच आपण सारे चुकतो. आपण जर डोळसपणे विश्लेषण केलं तर असं आढळेल कि मार्केट आणि आपलं वैयक्तिक जीवन यात बरेच सामान धागे आहेत. वैयक्तिक जीवनातही चढ-उतार होत असतात, आनंदानंतर दुःखाचे क्षण येतात. आयुष्य एकाच समान पातळीवरून कधीच चालत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात 'अप्स अँड डाउन्स' होतच असतात. अगदी तसंच मार्केटचंही आहे. ते कधीच एकाच पातळीवर जास्त काळ टिकून राहत नाही. आज 'ऑल टाइम हाय'वर असलेलं मार्केट उद्या 'ऑल टाइम लो' जाऊ शकतं. 'मार्केटमध्ये कधीही, काहीही घडू शकतं'. वर-खाली-सपाट या विविध पातळीवर मार्केटचा हा खेळ कितीतरी वर्षांपासून सुरु आहे. आणि पुढेही तो तसाच चालत राहणार.
त्यामुळे मार्केट असो कि तुमचं आयुष्य, सुख-दुःख, यश-अपयश, आशा-निराशा या मनाला विचलित करणाऱ्या अनुभवातही तुम्हाला धीरगंभीर आणि स्थितप्रद्न्य राहता आलं तर तुम्ही मार्केटमधून करोडो रुपये तर कमावू शकालच पण वैयक्तिक आयुष्यातही समाधानी राहाल.
प्रयत्न करून पहा. मला खात्री आहे, तुम्ही हे नक्कीच करू शकाल!!!
.png)
Comments