नाचणाऱ्या नवदुर्गा
- Wing Commander Pravinkumar Padalkar
- Oct 24, 2023
- 3 min read
काही वर्षांपूर्वी नवरात्रीत मी मुंबईत होतो. खरंतर इथल्या गर्दीमुळे आणि गतिमान आयुष्यामुळे मला मुंबई आवडत नाही. मला शांत आणि निवांत असलेली ठिकाणे जास्त भावतात. पण तरीही प्रत्येक ठिकाणाचे स्वतःचे एक वैशिष्ट्य असते. डोळे, कान उघडे ठेवले कि प्रत्येक गाव, तिथली माणसं, त्यांच्याबरोबर आलेले विविध अनुभव काही ना काही शिकवून जातात. तिथला एक रंग आयुष्याच्या पटलावर भरल्या जातो. अन मग आयुष्यभर तो त्या जागेशी निगडित राहतो. तसंच हा रंग मुंबईतील ह्या छोट्याशा मुक्कामात गवसला. आणि कायमचाच माझा झाला.
येथील महिलांचा दिवस पहाटे ४-५ वाजता सुरू होतो. उठल्यापासून त्यांना बिलकुल उसंत नसते. अगदी श्वास घ्यायलाही वेळ मिळू नये अशी त्यांची व्यथा असते. अनेक महिलांना आजही जवळच्या सार्वजनिक नळातून पाणी आणून दिवसाची सुरुवात करावी लागते. पाण्याची हि मोहीम संपली कि घरकामाचा न संपणारा तगादा सुरु होतो. झाड लोट, मुलांना तयार कर, स्वयंपाक, डबा भरणे, नवऱ्याचा चहा पाणी एक ना अनेक. आणि मग सरते शेवटी स्वतः तयार होऊन धावत पळत ८:१० ची लोकल पकडणे आणि पळत पळत जाऊन ऑफिसच्या मस्टरवर वेळेत सही करणे. ऑफिसमध्ये दहा तास काम करणे अन गर्दीत धक्के सहन करीत रात्री आठ वाजता घरी पोहोचणे.
हि फक्त मुंबईतल्या महिलांची दिनचर्या नाही तर देशातील सर्वच ठिकाणी कमी जास्त प्रमाणात सगळ्या महिलांची हीच दिनचर्या असते. उच्च शिक्षित असो, शिक्षित असो, अशिक्षित असो, काम करणारी असो कि फक्त घरकाम करणारी असो. या चक्रातून फार कमी जणींची सुटका होते. एका ठराविक चाकोरीतून त्यांचं आयुष्य फिरत राहतं. घड्याळाच्या काट्याप्रमाणे. पण न टिकटिक करता. न किरकिर करता. हे चक्र केवळ काही दिवसांसाठी असतं तरी मान्य होतं पण ते वर्षो न वर्षे सुरूच राहतं. अगदी असंच. न थांबता. अविरतपणे. रविवारीच काय ती थोडी फुरसत मिळते. स्वतःकडे वळून पाहण्याची. नाहीतर एरवी घड्याळाच्या काट्यापेक्षाही वेगाने ह्यांची कामे चालू राहतात. जणु दोन नाही बारा हात असावेत अशी. कोणी आपल्या कुटुंबापायी इतकं झोकून कसं देऊ शकतं? अन तेही निरपेक्षपणे? स्वतःचं स्वत्व बाजूला सारून. "मी" पणाला तिलांजली देऊन. मला त्यामुळेच ह्यांचं फार कौतुक वाटतं. अभिमान वाटतो. पण मला ह्यापेक्षाही जास्त कौतुक दुसऱ्याच गोष्टीचं आहे. इतके सारे कष्ट करूनही, इतकं व्यस्त असूनही जेंव्हा-जेंव्हा सणाचे दिवस येतात तेंव्हा-तेंव्हा यांच्या बारा हातांना अजून चोवीस हात फुटतात. कुठून कोण जाणे. पण फुटतात नक्की. सणाच्या दिवशी या सर्वजणी आपल्या घराला सजवतात, घरच्यांना सजवतात, स्वतः नटून थटून तयार होतात आणि आपली सगळी दुःखे विसरून उत्साहात तो सण साजरा करतात.
नवरात्री आली कि मला हमखास मुंबई आठवते. नवरात्र म्हणजे उत्सवाची सुरुवात. देवी दुर्गा ही स्त्री शक्ती आणि उर्जेचे प्रतीक. हा सण इतक्या जवळून अनुभवण्याची संधी मला यापूर्वी कधीच मिळाली नव्हती. मुंबईत असतांना पहिल्यांदाच मी नवरात्रीचा उल्हास, उत्साह, जोश जवळून पहिला. आणि मी तो आजही माझ्या अंतर्मनात जपून ठेवला आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मला स्टेशनवर, रस्त्यावर आणि ऑफिसमध्येही सगळीकडे फक्त पिवळाच रंग दिसत होता. प्रत्येक दुर्गेने पिवळ्या रंगाची साडी वा ड्रेस घातलेला होता आणि त्या सर्वजणी अतिशय सुंदर दिसत होत्या. जणू एक पिवळसर फुलांचा ताटवा हवेबरोबर डुलत असावा. दुसऱ्या दिवशी हा फुलांचा ताटवा रंग बदलून हिरवा झाला. मी माझ्या मैत्रिणीला विचारले, "सगळ्या जणी एकाच रंगात कशा?" ती म्हणाली, "नवरात्रीच्या काळात प्रत्येक दिवस एका विशिष्ट रंगाने चिन्हांकित केला जातो आणि म्हणूनच त्या दिवशी सर्व महिला एकाच रंगाचे कपडे घालतात." मग पुढचे नऊ दिवस मी या बदलणाऱ्या गुलाबी, राखाडी, लाल अशा विविध रंगाकडे थक्क होऊन बघत राहिलो. घरची कामं, ऑफिसची दगदग या सर्व कटकटीतून उद्या कोणत्या रंगाची साडी घालावी हे लक्षात ठेवणं, ती तशी तयार करणं अन इतक्या घाई गडबडीत ती घालून नटून थटून, तयार होऊन ऑफिसला येणं. हि तारेवरची कसरत ह्या इतक्या सुलभतेने कशी करू शकतात म्हणून मी अचंभित होतो. अन आजही आहे.
दसऱ्याचा दिवस उजाडला. त्या दिवशी मी डेक्कन क्वीनने पुण्याला परतत होतो. गाडी येण्याची वाट पाहात मी प्लॅटफॉर्मवर थांबलो होतो. अचानक, मला महिलांच्या डब्याजवळ मोठ मोठ्या आवाजात गाण्यांचा आवाज आला. आणि मी जे पाहिले तो एक दिव्य अनुभव होता. कधीही न विसरणारा. रोमांचकारी. वीसेक महिला मंत्रमुग्ध होऊन त्या प्लॅटफॉर्मवर गरबा खेळत होत्या. एका मोठया वर्तुळात नाचत गात होत्या. आनंदात पूर्णपणे तल्लीन झाल्या होत्या. आणि माझ्यासह सुमारे शंभर गृहस्थ हे दृश्य अनिमिष नजरेनं पाहत उभे होते. तो रेल्वेचा प्लॅटफॉर्म या महिलांच्या उस्फुर्त ऊर्जेनं झगमगून गेला होता. या सामान्य स्त्रिया नव्हत्या. तर वीस दुर्गा त्यांच्या कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक विवंचना काही क्षणासाठी दूर सारून आपलं "मी" पण जगत होत्या. अनुभवत होत्या.
हा माझ्यासाठी डोळे दिपवणारा एक विलक्षण अनुभव होता. अत्यंत प्रेरणादायी असा. या नाचणाऱ्या नवदुर्गांनी मला जीवनाकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टीकोन दिला. मी जर इतक्या साऱ्या विवंचनेत भरडून निघालो असतो, आयुष्य रोज अशी परीक्षा घेत असतं तर मी इतक्या उत्साहात नाचू शकलो असतो का? नक्कीच नाही. हे होणे नव्हे. वैयक्तिक जीवनात, आयुष्य दर घडीला परीक्षा पाहात असतांना, सर्वोत्तम पेहराव करून नटून थटून सजणे अन उन्मुक्तपणे असं नाचणे यासाठी मनाची अनोखी शक्ती हवी, जिद्द हवी, छोट्या छोट्या गोष्टीतून जगण्यातील आनंद वेचता यायला हवा. आणि हे फक्त ह्या नवदुर्गाच करू जाणे. आणि म्हणूनच माझ्याकडे त्यांच्यापुढे नतमस्तक होण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता. आणि आजही नाही.
या नवदुर्गा आपल्या जीवनात आहेत म्हणूनच आयुष्यातील मोरपंखी रंग कायम आहेत. आणि ते तसेच कायम राहोत याच सदिच्छा.
शहर का तब्दील होना शाद रहना और उदास
रौनक़ें जितनी यहाँ हैं औरतों के दम से हैं । ---- मुनीर नियाज़ी
.png)
Comments