दिवाळी भेट :- पुस्तकांची मेजवानी
- Wing Commander Pravinkumar Padalkar
- Nov 11, 2023
- 2 min read
दर वर्षी दिवाळी आली कि ती आपल्या बरोबर मनात लपलेला ठराविकसा रंग, गंध, आवाज घेऊन येते. प्रत्येक दारात लटकलेले पिवळे, लाल आकाशकंदील दिसतात. फुलझड्या, भुईनळे यातून उडणारी रंगबिरंगी आतिषबाजी डोळ्यापुढे उभी राहते. सुतळी बॉम्बचे कर्णकर्कश्य आवाज कानाला दडे पाडतात. त्या फटाक्यातून निघणाऱ्या धुराचा धुरकट वास छातीत भरतो. स्वयंपाकघरातून येणारा चकल्या, करंज्या, लाडु, चिवडा याचा संमिश्र खरपूस सुवास तोंडात पाणी आणतो.
फराळ आणि फटाक्यांच्या जोडीनेच दिवाळीच्या निमित्ताने अजून एक गोष्ट हमखास आठवते आणि ती म्हणजे पुस्तकांची. लहान असतांना शाळेला दिवाळीची सुट्टी मिळायची. खेळून खेळून थकल्यानंतरही वेळ उरायचा. या फावल्या वेळात काय करू? काय करू? म्हणून आईच्या मागे लागल्यावर आईने तेंव्हा एक पुस्तक हातात ठेवलेलं. पुस्तक कोणतं होतं ते आता आठवत नाही पण ते वाचून संपल्यावर अजून एक पुस्तक वाचावं असं वाटत राहिलं. दोन शंकरपाळे खाल्ल्यावर अजून चार खावे असं वाटावं तसं एक पुस्तक संपलं कि दुसरं मिळावं असं वाटायला लागलं. अन मग त्या दिवाळीपासून हि पुस्तकाची गोडी लागली. पण शंकरपाळ्यासारखी पुस्तकं घरात कशी बनवणार? मोठी पंचाईत झाली. पण देव पावला अन ती लगेचच सुटलीही. उन्हाळ्याच्या सुट्टीत मोठया भावाच्या घरी गेल्यावर दिसलं कि त्याच्याकडे एक नाही तर हजार पुस्तकं भरलेली मोठी लायब्ररीच आहे. मला जणु अलिबाबाची गुहाच गवसली. मग काय त्या पूर्ण सुट्टीत हाताला लागतील ती पुस्तकं वाचून काढली. जी आवडली ती पूर्ण वाचली. आवडली नाही ती सोडून दिली.
मोठं होत जातांना हे वाचनाचं वेड वयोमानाप्रमाणे वाढत गेलं. इतक्या वर्षात अनेक प्रकारची पुस्तकं वाचण्यात आली. दिसली कि वाचलीच असं. अन बघता बघता माझी स्वतःची अशी एक लायब्ररी तयार झाली. त्यातली बरीचशी पुस्तकं वाचून विसरली गेली. पण काही पुस्तकांनी मनावर कायमचीच छाप सोडली आहे. खास अशी. पहिल्या प्रेमासारखी. या पुस्तकांनी मनाचा एक कप्पा कायम व्यापलेला आहे. आजही, इतकी वर्षे झाली तरीही या पुस्तकांची गोडी थोडीदेखील कमी झालेली नाही. होईल असं वाटत नाही. आईच्या हातच्या करंज्यांसारखी.
आजही नवीन पुस्तक मिळालं नाही कि मी या पुस्तकातून हाताला येईल ते पुस्तक काढतो अन ते पुन्हा एकदा वाचायला सुरुवात करतो. लंपन म्हणतो तसं अठराशे वीस वेळेस वाचून झालं तरीही.
माझ्या मनातील पुस्तकांची हि यादी. एक अनोखी दिवाळी भेट. खास तुमच्यासाठी. आवडती इंग्रजी पुस्तके पुढील ब्लॉग मध्ये समाविष्ट करेल.
प्रकाश नारायण संत
१. पंखा
२. वनवास
३. शारदा संगीत
४. झुंबर
व्यंकटेश माडगुळकर
५. बनगरवाडी
६. माणदेशी माणसं
७. करुणाष्टक
८. सत्तांतर
९. जांभळाचे दिवस
१०. हस्ताचा पाऊस
११. बाजार
१२. प्रवास एका लेखकाचा
१३. जंगलातील दिवस
१४. वावटळ
१५. चित्रे आणि चरित्रे
१६. वाटा
१७. गावाकडच्या गोष्टी
पु ल देशपांडे
१८. व्यक्ती आणि वल्ली
१९. वंगचित्रे
२०. पूर्वरंग
२१. अपूर्वाई
२२. जावे त्यांच्या देशा
२३. आपुलकी
२४. गणगोत
२५. बटाट्याची चाळ
सुनीता देशपांडे
२६. आहे मनोहर तरी
२७. प्रिय जीए
२८. सोयरे सकळ
जी ए कुलकर्णी
२९. रमलखुणा
३०. रक्तचंदन
३१. पारवा
३२. सांजशकुन
३३. निळा सावळा
शंकर पाटील
34. वळीव
बहिणाबाई चौधरी
३५. बहिणाबाईंची गाणी
ग दि माडगुळकर
३६. मंतरलेले दिवस
३७. वाटेवरल्या सावल्या
दुर्गा भागवत
३८. ऋतुचक्र
३९. पैस
४०. व्यासपर्व
गंगाधर गाडगीळ
४१. कडु आणि गोड
४२. तलावातले चांदणे
४३. गाडगीळांच्या कथा
प्र के अत्रे
४४. मी कसा झालो
४५. कर्हेचे पाणी
जे घर पुस्तकांनी भरलेलं असतं तिथे सरस्वती नांदते. आणि जिथे सरस्वती नांदते तिथे लक्ष्मीचा निवास कायम असतो.
मनाला भावलेल्या अशाच पुस्तकांनी तुमची स्वतःची एक परिपूर्ण लायब्ररी बनो आणि त्या पुस्तकांच्या सहवासात तुमचं आयुष्य सदैव समृद्ध राहो या शुभेच्छा.
.png)
Comments