आज कल पांव जमीं पर नही पडते मेरे !!!
- Wing Commander Pravinkumar Padalkar
- Feb 24, 2024
- 1 min read
आजकाल स्टॉक मार्केटमधील गुंतवणूकदारांची मनःस्थिती अशीच झाली आहे. त्यांचे पाय जमिनीवर नाहीत. ते सर्वजण आकाशात उडत आहेत. माझे सारे गुंतवणूकदार, जे माझे मित्र आहेत, ते सर्व या घडीला आनंदात आहेत. याचं कारण हे आहे कि गेल्या एका वर्षांपासून मार्केट सतत वरच्या दिशेने धावत आहे. आणि प्रत्येकाच्या पोर्टफोलिओमध्ये भरघोस नफा दिसत आहे.
जिथे एफडी मध्ये सात टक्के मिळण्याची मारामार आहे तिथे तीस, चाळीस, पन्नास टक्के नफा मिळणं म्हणजे लॉटरी लागण्यासारखं आहे.
बाजारात उत्साहाला उधाण आलं आहे. जो तो उड्या मारतो आहे. बघावं तिकडे मार्केटचीच चर्चा आहे. मला किती फायदा झाला याच्या गोष्टी रंगवून सांगितल्या जात आहेत. पान टपरीवरील तो पानवाला भैयासुद्धा, "सर ये स्टाक लेलो, बहूत दौडेगा" म्हणत फुकटची टीप द्यायला लागला आहे. जो तो मार्केट एक्सपर्ट झाला आहे. टीव्ही वरील पंडित, "मार्केट अब रुकेगा नहीं" म्हणत या उधाणाला पूर आणत आहेत. अतिउत्साही टिव्ही अँकर्स या आगीत तेल टाकत आहेत. त्यांना त्यांची टीआरपी वाढवायची आहे. वातावरणात जोश, आनंद, उल्हास ओसंडून वाहत आहे.
जणू ...
आज कल पांव जमीं पर नही पडते मेरे !!!
इतका मोठा नफा तोही एका वर्षात ? हे कसं शक्य आहे ?
पण हे झालं मात्र नक्की आहे. या क्षणाला हेच एकमेव वादातीत वास्तव आहे. सत्य आहे.
हा असा भरघोस नफा बघून साहजिकच सर्वांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. येणाऱ्या भविष्यातही असाच नफा होत राहील हि आशा ते बाळगून आहेत.
आणि इथेच माझी खरी भूमिका सुरु होते. "पिन मारायची".
दर वेळेस प्रमाणे मला या अपेक्षेच्या फुग्याला पिन मारायची आहे. हेच माझं खरं काम आहे. मला उडणाऱ्या या सर्व लोकांना जमिनीवर ठेवायचं आहे.
हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे कि असा नफा हा दर वर्षी होणार नाही. मार्केट असं एकाच दिशेने कधीच जात नाही. आणि जेंव्हा एखाद्या वर्षी इतका जास्त नफा होतो याचाच अर्थ असा कि पुढच्या वर्षी कमी नफा होईल किंवा नफा होणारही नाही.
एका वर्षात तीस, चाळीस, पन्नास टक्के नफा होणं हा अपवाद आहे. It is just an aberration.
सध्या मार्केटचा बुल फेज (Bull phase) सुरु आहे. त्यामुळे कंपनी कितीही खराब असली तरीही त्या कंपनीचे शेअर वाढतच आहेत. या फेजमध्ये हे असंच होतं. पण बुल फेजही काही वर्षात बदलतो. मार्केटमध्ये काही वर्षे अशीही येतात जेंव्हा मार्केट निगेटिव्ह रिटर्न देतं. यालाच आपण बेअर फेज (Bear phase) म्हणतो. जरी निगेटिव्ह रिटर्न दिला नाही तरी कधी कधी काहीच रिटर्न मिळत नाहीत. यालाच आपण कन्सॉलिडेशन फेज म्हणतो. बुल फेज आणि बेअर फेजचं चक्र सतत सुरु असतं. दिवसानंतर जशी रात्र येते तसंच.
नवीन गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांनी बेअर फेज अजूनही अनुभवलेला नाही. त्यामुळे त्यांचा अपेक्षाभंग होणं साहजिकच आहे. त्यांना ह्या अपेक्षाभंगाने धक्का पोहोचू नये म्हणूनच हा सारा शब्दप्रपंच.
मार्केटमध्ये कधी कधी अशा अनपेक्षित गोष्टी घडतात. Sometimes market behaves irrationally. आणि यामुळे आपल्या अपेक्षा उंचावल्या जातात. पण अपेक्षा उंचावल्या कि अपेक्षाभंग हा होणारच हेही त्रिवार सत्य. आणि हि जाणीव नेहमी असणं हेही आवश्यक.
अपेक्षा आणि वास्तव या दोन टोकावर मानवी मन झुलत राहतं.
आशा, निराशा. अपेक्षा, अपेक्षाभंग. ग्रीड आणि फिअर या भावनिक पैलूंवर मार्केट अवलंबून असतं.
सुजाण गुंतवणूकदारांनी या जाळ्यात न फसणंच हिताचं.
मार्केट कितीही वर गेलं किंवा कितीही खाली गेलं तरीही शांत राहून त्याकडे निरपेक्षपणे बघत राहणे हीच खरी तपस्या आहे. आणि या खेळाचं गमक यातच सामावलेलं आहे. ज्याला हे कळलं, आणि ज्यानी हे अवलंबिलं तोच या खेळात यशस्वी झाला.
त्यामुळे पुढे चालून भविष्यात मार्केटकडून जास्त अपेक्षा न ठेवलेलीच बरी.
मग अपेक्षा ठेवावी तरी किती आणि काय ?
मार्केटचा तीस वर्षांचा इतिहास बघितला तर असं दिसून येतं कि दीर्घकालीन गुंतवणुकीत मार्केट दहा ते बारा टक्के परतावा नक्कीच देते. आणि इतका परतावा जरी मिळाला तरी जगण्याचा आनंद लुटता येईल इतकी संपत्ती नक्कीच जमा होते. त्यात उगाचच काळजी करण्याचं किंवा हवेत उडण्याचं कारण नाही.
खरा सवाल हा आहे कि पैसे मिळवूनही आपण जगण्यातला आनंद वेचतो का ?
…………………….
काल रात्री मी बाल्कनीत बसलो होतो. काहीही न करता. आकाशाकडे बघत. असा मी दररोजच बसतो. पण कालची रात्र वेगळी होती. थंड गार हवा सुटली होती. मनाला उल्हसित करीत होती. बाल्कनीतून आकाशाचा इवलुसा तुकडा दिसत होता. दूरवर तारे टिमटिमत होते. आणि बघता बघता अचानक भला मोठा चंद्र अवतरला. पौर्णिमेचा. पांढुरका केशरी. त्यावरच्या काळसर ठिपक्यांसह. हात लांबवून त्याचा गालगुच्चा घ्यावा इतका जवळ.
आणि या अशा स्वर्गीय समयी हे गाणं सुरु होतं. मनाला मोहून टाकणारं गाणं. सूर, ताल, शब्द यांच्या मिलनानं निर्मिलेली एक अजरामर कलाकृती. माझ्या गाण्याच्या यादीतील एक आवडतं गाणं. अर्थातच गुलझार यांचं.
आज कल पांव जमीं पर नही पडते मेरे !
बोलो देखा है कभी तुमने मुझे उडते हुए ?
.png)
Thanks for the post. After reading it a phrase resonates - Your patience will earn more than youur force.
व्वा
अप्रतिम
Nicely explained and alerted investors like me. Thank you