top of page

बिहेवियरल फायनान्स :- केस स्टडी १

मागच्या आठवड्यात बिहेविअरल  फायनान्सचा अतिशय महत्वाचा पैलु  पाहायला मिळाला. मला खात्री आहे हा अनुभव माझ्या इतर मित्रांना बरंच काही शिकवून जाईल.


दीप्तीशी मध्ये मध्ये तिच्या म्युच्युअल फंडाच्या पोर्टफोलिओ बद्दल बोलणं होत असतं. मागील एका वर्षांपासून मार्केट सतत  वरच जात आहे आणि त्यामुळे तिला  म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ मधून  चांगलाच फायदा झाला आहे. पण परवा तिनी थोडंसं बिचकतच फोन केला. मला सांगावं कि न सांगावं अश्या भ्रमात ती होती. पण मी थोडासा धीर दिल्यावर आणि  भरवसा दाखवल्यावर ती थोडी मोकळी झाली आणि तिने तिच्या मनात दडलेली चिंता मोकळेपणानं सांगितली.


म्युच्युअल फंडाच्या पोर्टफोलिओबरोबरच तिने काही पैसे शेअरमध्ये गुंतवले होते. पण मार्केट इतकं वर जाऊनही तिला  त्यात नुकसानच दिसत होतं. ह्यामुळे ती काळजीत होती आणि हे  अगदी साहजिकच होतं. इतक्या मेहनतीने कमावलेले पैसे असे  डोळ्यासमोर कमी होतांना पाहणं हे  कोणासाठीही कष्टदायकच. तिला ह्या पोर्टफोलिओवर सल्ला हवा  होता. 


दहा लाखाचा तिचा पोर्टफोलिओ आज सात लाखावर आला होता. चक्क तीन लाखाचा तोटा. तोही मार्केट इतकं वर जात असतांना. हे सहन करणं कोणालाही इतकं सोपं  नसतं हे मी जाणून होतो. 


तिला बोलल्यावर मला उमगलं कि तिने काय विचार करून गुंतवणूक केली होती. ती कारणे अशी होती ;- 


१.स्वतः अभ्यास न करता कोणाच्या तरी  सांगण्यावरून, ऐकीव माहिती वरून तिने पैसे गुंतवले  होते 

२.ज्या कंपन्यात पैसे लावले होते त्यातील काही कंपन्या तर अगदीच खालच्या  दर्जाच्या होत्या 

३.ज्या किमतीवर खरेदी केली होती (buying price) ती पातळी खूपच वरची होती

४.पोर्टफोलिओ बॅलन्स नव्हता 

५.कोणत्या शेअरमध्ये किती नुकसान  झालं तर तो विकायचा (stop loss) किंवा कोणत्या कारणाने तो विकायचा हे निश्चित केलेलं नव्हतं 


या परिस्थितीमध्ये तिच्यापुढे दोन पर्याय होते:-


१.नुकसान देणारे शेअर तसेच ठेवणे  आणि आपली किंमत येण्याची वाट  पाहात बसणे किंवा 

२.ते शेअर विकून जे पैसे हातात पडतील ते दुसऱ्या चांगल्या कंपनीमध्ये  गुंतवणे आणि त्यातून मग फायदा 

मिळवणे 


या दोन पर्यायातून बहुतांश गुंतवणूकदार पहिला पर्यायच निवडतात. कोणालाही तोटा करून शेअर विकावा वाटत नाही. हि एक मानसिकता आहे. पण यात फार मोठे नुकसान आहे. कोण जाणो हा तोटा वाढून तीस हजाराचा पन्नास हजार होईल, मग साठ हजार होईल आणि मग नाईलाजाने तुम्ही तेंव्हा तो शेअर विकाल. आणि होतंही असंच. बहुतांश वेळी नुकसान वाढत जातं आणि गुंतवणूकदार मग शेवटी तोटा सहन न होऊन तो शेअर जास्त नुकसानीत विकून बाहेर पडतो. दर वेळेस हे असंच होतं. 


मी तिला स्पष्ट सांगितलं कि जे शेअर  विश्वासार्ह आणि चांगल्या कंपनीचे  नाहीत त्यांना लगेचच तोट्यात 

असूनही विकून टाक आणि जितके पैसे मिळतील ते मग आपण हळुहळु चांगल्या कंपन्यात गुंतवू. यातून मग नुकसानही भरून निघेल आणि काही वर्षात भरपूर फायदाही होईल.


पण हे सांगणं सोपं होतं आणि अवलंबणे अवघड. म्हणजे एखाद्या शेअरमध्ये केलेल्या एक लाख गुंतवणुकीवर जर तीस हजार  नुकसान होत असेल तर तो शेअर इतक्या तोट्यात विकणं कोणालाही जीवावरच येणार. 


पण शेवटी माझ्यावर विश्वास ठेऊन तिने ते शेअर विकले. तोटा सहन केला. मला खात्री आहे तिला यातून बरंच काही शिकायला मिळालं असेल.  


या केस स्टडीतुन बिहेविअरल  फायनान्सच्या खालील बाबी आपणास  नक्कीच शिकता येतील :- 


१. हर्ड बायस (herd bias) किंवा हर्ड मेन्टॅलिटी (herd mentality). आपले मित्र किंवा शेजारी शेअरमध्ये पैसे गुंतवत आहेत हे बघून मग आपणही  गुंतवले पाहिजेत हि सुप्त इच्छा.


२. संक कॉस्ट फॅलेसी (sunk cost fallacy). भले कितीही नुकसान होवो केलेली  गुंतवणूक तशीच ठेवणे 


३. फॉल्स होप (false hope). भाबडी आशा.  ह्या आशेवर जगणे कि हे नुकसान कधी तरी भरून निघेल. 


४. ग्रीड (greed).  शेअरमध्ये पैसे गुंतवल्यास, म्युच्युअल फंडात होणाऱ्या फायद्याहून

अधिक फायदा होईल हा लोभ 


५. स्टॉप लॉस (stop loss). स्टॉप लॉस न लावणे. 


६. ज्या गोष्टीचे आपल्याला ज्ञान नाही, अभ्यास नाही त्यात पैसे गुंतवून नुकसान करून घेणे हे योग्य नव्हे.


७. आपली मनःशांती (peace of mind) न बिघडवता, रात्रीची झोप न घालवता जर म्युच्यअल फंडातून योग्य परतावा मिळत असेल तर उगीचच शेअरमध्ये  गुंतवणूक करून  धोका पत्करू नये.  


खरं पाहू जाता हि फक्त दीप्तीचीच गोष्ट नव्हे.सर्व गुंतवणूकदार या परिस्थितीतून जातातच.यातून  कोणाचीच सुटका नाही.माझीही.मीही हे सर्व भोगून आज  इथपर्यंत पोहोचलो आहे.म्हणुनच माझ्या अनुभवाचा थोडासा फायदा माझ्या  मित्रांना व्हावा ह्या भावनेने, पोटतिडकीने केलेलं हे पांढऱ्यावर काळं.  


Charlie Munger said, “The human mind naturally tries to make you think you’re way smarter than you are.”


 






 
 
 

Recent Posts

See All
मार्केटचा गुरुमंत्र

त्यामुळे मार्केट असो कि तुमचं आयुष्य, सुख-दुःख, यश-अपयश, आशा-निराशा या मनाला विचलित करणाऱ्या अनुभवातही तुम्हाला धीरगंभीर आणि स्थितप्रद्न्य

 
 
 
गोष्ट दहा करोडची

परवा गप्पा मारतांना माझ्या एका मित्राने मला विचारलं,"स्टॉक मार्केटमधून किती पैसे कमावता येतील?" मी म्हणालो, "जितकी जास्त वर्षे गुंतवणूक,...

 
 
 

Comments


Stay updated and enhance your wisdom about wealth creation

Thanks for subscribing!

bottom of page