top of page

आपला जोडीदार कसा शोधावा ?

अमितला तिसाव्व वय लागलं आणि त्याच्या आईची काळजी दर दिवसागणिक वाढु लागली. आज लग्नाच्या ऍपवर नोंद करून तीन वर्षे झाली होती. या तीन वर्षात दहाएक मुलींचा बायोडाटा त्याला आवडला होता आणि त्यांच्याशी भेटणंही झालं होतं. काही मुलींना यानं रिजेक्ट केलं होतं तर काही मुलींनी याला. दर वेळी वेगळंच कारण होतं. पण अजूनही लग्नाचं घोडं पुढे जात नव्हतं. आणि यामुळेच आई काळजीत होती. तिनं आपल्या परीनं सगळं करून पाहिलं होतं. मैत्रिणींना, नातेवाईकांना, शेजाऱ्यांना अमितचा बायोडाटा पाठवला होता. होत्या नव्हत्या सगळ्या देवांना साकडं घालून झालं होतं. नवस, उपास तापास तर सुरूच होते. पण तरीही योग काही जुळून येत नव्हता.


पोराचं लग्न पटकन व्हावं याची तिला कोण घाई झाली होती. खरं तर सर्व काही चांगलं होतं. स्वतःचं घर होतं, गाडी होती, अमितला चोवीस लाखाचं पॅकेज होतं, अमितचे बाबा चांगल्या पोस्टवर नोकरी करत होते. अमित दिसायलाही चार चौघांसारखाच होता. अजून काय पाहिजे होतं? पण इतकं सारं असूनही लग्नाची वाजंत्री काही वाजत नव्हती. वाट पाहून पाहून आई थकून गेली होती. अमितचाही संयम आता सुटायला लागला होता.


पण हि फक्त एकट्या अमितचीच व्यथा नाही. आजकाल अमितसारख्याच खुपसाऱ्या मुलामुलींची लग्न व्हायला बराच उशीर होत आहे. मुलं मुली सहजच तिशी पस्तिशीत पोहोचत आहेत आणि तरीही त्यांची लग्न जुळून येत नाहीएत. वेळेवर लग्न न होणं हि आज एक सामाजिक समस्या झाली आहे.


लग्न लवकर न जुळणं याची बरीच कारणं आहेत. पण त्यातील महत्वाची कारणं हि आहेत:-

१. मुलगा, मुलगी शोधण्यात असलेला आईचा अनावश्यक आणि अतिरेकी हस्तक्षेप. बऱ्याच वेळेस तर लग्नाचं ऍप आईच हॅन्डल करते. तीच फिल्टर्स ठरवते, टाकते, आणि तिला जर आवडला तरच ती पुढे मुलाला / मुलीला सांगते.

२. मुला मुलींच्या एकमेकांबद्दल असलेल्या अवास्तव आणि अनाठायी अपेक्षा आणि अटी.

३. पॅकेजच्या आकड्यांबरोबर फुगत चाललेला इगो.

४. बेगडी स्त्री-स्वातंत्र्याची परिभाषा.


जोडीदार कसा असावा ?


या वयात आपण सर्व जण फक्त बाह्य गुणांवर भाळलेले असतो. पण खरं पाहु जाता रंग, रूप या भौतिक गुणांपलीकडे जाऊनच या प्रश्नाचं उत्तर मिळु शकतं. जोडीदार निवडतांना सर्वात महत्वाचा प्रश्न हा असतो कि मी याच्यासोबत / हिच्यासोबत आयुष्यभर राहू शकेल का? जर या प्रश्नाचं उत्तर हो असेल तर मग तोच तुमचा खरा जोडीदार. पण हे असं ओळखायचं कसं? या वयात हे उमजणे नक्कीच सोपे नाही.


म्हणूनच या सर्व अविवाहित मुला मुलींसाठी मी हि एक चेकलिस्ट देत आहे.


लग्न हि एक लॉन्ग टर्म रिलेशनशिप आहे. लॉन्ग टर्म कमिटमेंट आहे. दोन तीन वर्ष नव्हे तर तीस, चाळीस, पन्नास वर्षाचं हे नातं आहे. ते जर यशस्वी करायचं असेल तर त्यासाठी जोडीदाराचा स्वभाव, वागणं, वैचारिक बैठक, (थिंकिंग प्रोसेस अँड बिहेविअर) हे महत्वाचं आहे. आणि जोडीदार निवडतांना ते अचूकतेने जोखता आले पाहिजे. त्यासाठी जोडीदारात खालील गुण असणे आवश्यक आहेत:-


1. एकमेकांवरील विश्वास

2. समजुतदारपणा

3. मनमिळाऊपणा

4. सासू, सासरे व घरातील इतर नातेवाईकांशी जुळवुन घेण्याची क्षमता

5. दुसऱ्याचं दुःख, वेदना, अपेक्षा, आकांक्षा समजून घेणे

6. एकमेकांबद्दल आदर

7. मनात काहीही आडपडदा न ठेवता आपले विचार स्पष्टपणे मांडणे

8. Flexibility and adaptability

9. Ability to let go and move on

10. Ability to compromise


सर्वगुणसंपन्न असे जगात कोणीच नाही. त्यामुळे सर्वगुणसंपन्न किंवा आपल्या सर्व निकषांवर खरा उतरणारा जोडीदार मिळावा हि अभिलाषा ठेऊ नका. तो तसा कधीच भेटणार नाही. त्यामुळे ऍपमध्ये कमीतकमी निकष (क्रायटेरिया/ फिल्टर) लावा जेणेकरून तुमच्याकडे जास्तीत जास्त पर्याय उपलब्ध होतील. मोर द बेटर. फिल्टर लावतांना जितकं होता येईल तितकं फ्लेक्सिबल राहिलेलं चांगलं. उगीचच पॅकेज, उंची, वय, शहर, नॊकरी, पत्रिका यावर जास्त चोखंदळ न राहणं योग्य. पॅकेज, उंची, वय हे थोडं फार कमी जास्त असेल तरीही पुढे चालून आयुष्यात काहीच फरक पडत नाही. जर कोणाचा बायोडाटा आवडला तर केवळ फोटोवरून तो नाकारणं हे अतीशय चुकीचं. खूपदा चांगल्या दिसणाऱ्या व्यक्तींचे फोटो कधी-कधी चांगले येत नाहीत. आणि केवळ फोटो चांगला नाही म्हणून कुणाला डावलणे हे योग्य नव्हे. हि फ्लेक्सिबिलिटी ठेवली तर मनाला साजेसा जोडीदार मिळण्याची शक्यता वाढेल.


भावी जोडीदाराबरोबरची पहिली भेट कशी असावी ?


बायोडाटा आवडला कि दुसरी पायरी प्रत्यक्ष भेटीची. पहिल्या भेटीला जातांना, तुम्ही ज्या ड्रेसमध्ये सर्वात जास्त कंफर्टेबल आणि कॉन्फिडन्ट असाल तो ड्रेस घालून भेटायला जा. उगीचच अंडर कॉन्फिडन्ट किंवा ओव्हर कॉन्फिडन्ट होऊ नका. Be at ease. जसे इतर मित्राला / मैत्रिणीला भेटायला जाता तसेच जा. जे तुम्ही नाही आहात ते दाखवायचा प्रयत्न करू नका. जसे आहात तसेच राहा. प्रामाणिक राहा. डोळे आणि कान उघडे ठेवा. प्रत्येक गोष्ट बारकाईने ऐका, बघा. कमी बोला, जास्त ऐका. मधेच दुसऱ्याचं बोलणं खोडू नका. हि पहिलीच भेट आहे हे लक्षात असू द्या. या भेटीत अतीशय पर्सनल असे प्रश्न विचारणे टाळा. या भेटीमागचा उद्देश हा फक्त observe करणे आणि मोघम माहिती मिळवणे हा आहे. दुसऱ्याला अवघडून जाईल असे प्रश्न विचारू नका.


पहिल्या भेटीत तुम्ही खालील गोष्टींवर गप्पा मारू शकता :-

1. आई वडील काय करतात, भावंडं किती आहेत?

2. शिक्षण कुठे झालं?

3. मित्र / मैत्रिणी किती आहेत, ते काय करतात, कुठे असतात ?

4. आवडी निवडी काय आहेत?

5. नौकरी, पॅकेज

6. व्हेज कि नॉनव्हेज ?

7. स्वयंपाक करायला आवडतं का? कोणता पदार्थ सगळ्यात जास्त आवडतो?

8. ड्रिंक्स, स्मोकिंग करता का?


या पहिल्या भेटीत शक्य होईल तितक्या मोकळेपणाने गप्पा मारा. या भेटीला फक्त प्रश्न आणि उत्तर असं स्वरूप येऊ देऊ नका. "हो", "नाही" या ऑब्जेक्टिव्ह भाषेत बोलू नका. होईल तितकं विस्तारपूर्वक बोला.


पहिल्याच भेटीनंतर जजमेंटल होऊ नका. कोणताही निष्कर्ष काढु नका. एखाद्या तासाच्या पहिल्याच भेटीत कोणाचं पूर्ण व्यक्तिमत्व कळणं हे केवळ अशक्य आहे. त्यामुळे कोणतीही घाई करू नका. पहिल्या भेटीनंतर तुम्हाला नकार द्यायसाठी फक्त दोनच कारणे असु शकतात:-


1. तिला / त्याला पाहिल्याबरोबरच जर तुमच्या अंतर्मनातून आवाज आला (gut feeling) कि हा आपला जोडीदार होण्यासारखा नाही किंवा

2. पहिल्याच भेटीत मुलगा / मुलगी म्हणाली कि, “आपण दोघेच वेगळे राहू, मी तुझ्या आई बाबांबरोबर राहायला कंफर्टेबल नाहीए.”


असं घडलं तर दुसऱ्या दिवशी, “It was nice meeting you. But we cannot proceed further. All the best.” अश्या स्वरूपाचा मेसेज करून तसं कळवा.


परंतु पहिल्या भेटीत जर तो / ती थोडीदेखील ठीक ठाक वाटली तरी दुसऱ्यांदा भेटा. दुसऱ्यांदा भेटायची ऑपॉर्च्युनिटी दवडु नका.


दुसऱ्या भेटीत हॉटेलमध्ये भेटण्यापेक्षा बाहेर अनौपचारिक जागी जसेकी बागेत भेटायला जा. या भेटीत तुम्ही न बावरता, न लाजता मनमोकळेपणाने बोला. या भेटीतून तिचा / त्याचा स्वभाव कसा आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करा. मागील भेटीत काय घडलं होतं ते लक्षात ठेवा. तेच तेच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारू नका. या भेटीत खालील विषयांवर गप्पा मारा:-


1. पहिल्या भेटीत जी आवड सांगितली होती त्या आवडीवर बोला. जसेकी क्रिकेट, मुव्ही, गाणी, पुस्तके. जर तुमची आवड मॅच होत नसेल तर तसं सांगा. तिच्या बोलण्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. ती / तो बोलत असतांना उगीचच इकडे तिकडे पाहू नका. तिच्या डोळ्यात पाहून बोला. आय कॉन्टॅक्ट सोडू नका. जे बोलण्यातून समजत नाही ते डोळ्यातून उमजतं. डोळ्यांची भाषा समजून घ्या. तिला / त्याला बोलण्यात एंगेज करा.

2. आवड समजून झाल्यावर कोणती गोष्ट आवडत नाही हेही जाणून घ्या. एखादी गोष्ट न आवडणे आणि एखाद्या गोष्टीचा तिटकारा असणे यात खूप फरक असतो हे समजून घ्या. उदाहरणार्थ सिगारेट पिणं न आवडणे वेगळं आणि सिगारेट पिणाऱ्याचा तिटकारा असणं वेगळं. मुलींच्या “बिटवीन द लाईन्स” बोलण्याला समजून घ्या. कोणती गोष्ट समजली नाही तर पुन्हा विचारा. स्वतःच स्वतःच्या मनाने त्या बोलण्याचा अर्थ काढू नका.

3. सर्वात नाजूक प्रश्न म्हणजे कधी कोणाच्या प्रेमात पडला का? हा प्रश्न विचारतांना मन दुखावणार नाही याची काळजी घ्या. ती रिलेशनशिप का तुटली ते समजून घ्या. ह्या प्रश्नाचं उत्तर डोळ्यातूनच मिळू शकतं हे लक्षात ठेवा.

4. सध्या ज्वलंत असलेले सामाजिक प्रश्न जसेकी लिव्ह-इन, पार्टी कल्चर, वाढते डायवोर्सचे प्रमाण यावर तिची / त्याची मते जाणून घ्या.

5. मागील काही दिवसात घरात किंवा ऑफिसात कोणाशी भांडण झालं ? भांडणाचं काय कारण होतं ? ते कसं सोडवलं? त्या भांडणाचा किती दिवस मनावर ताण राहिला.

6. तुझी कोणती सवय अशी आहे जी तुला आवडत नाही ? ती बदलायला तु काय प्रयत्न केलेस ?

7. देव, पूजा यावर विश्वास आहे का? रोज पूजा करतो / करते का?

8. मेडिटेशन करते का? कोणतं मेडिटेशन करते. अशी कोणती गोष्ट घडली कि ज्यामुळे मेडिटेशन सुरु करावं असं वाटलं?

9. आयुष्यात आत्तापर्यंतची सर्वात आनंदाची गोष्ट कोणती होती? आणि दुःखाची कोणती? हे बोलता बोलता जाणून घ्या.

10. माझी किंवा माझ्या आईची एखादी गोष्ट आवडली नाही आणि त्यामुळे वादविवाद झाले, डिफरेन्स ऑफ ओपिनियन झाले तर काय करशील? हेही विचारा.

11. आयुष्यात पैश्याला किती महत्व आहे? पैसा मोठा कि आनंद ? Money or Happiness? हा मुद्दा डिस्कस करा. ह्या प्रश्नाचं उत्तर बऱ्याच गोष्टी स्पष्ट करेल.

12. तुमच्याकडून भावी आयुष्याबद्दल काय अपेक्षा आहेत हे स्पष्टपणे खोलात जाऊन जाणून घ्या.


जोपर्यंत "हो किंवा नाही " हा निर्णय सुस्पष्टपणे घेता येत नाही तोपर्यंत भेटत राहा. बोलत राहा. पण या सर्व भेटण्यात, बोलण्यात फेकपणा आणू नका. तुम्ही जसे आहात तसेच स्वतःला प्रोजेक्ट करा. हा नौकरीसाठीचा इंटरव्यू नाहीए तर तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे हे लक्षात असू द्या. बुद्धी काय सांगते, लॉजिक काय सांगतं यापेक्षा तुमचं अंतर्मन (gut feeling) काय सांगतं त्यावरूनच हा निर्णय घ्या. मन जे सांगेल तेच करा. लग्न होण्यास उशीर होत आहे म्हणून गडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. Better late than divorce.


या भेटण्यातून, संभाषणातून अशी एक वेळ नक्कीच येईल कि ती / तो तुम्हाला आवडायला लागेल. आणि जेंव्हा अशी वेळ येईल तेंव्हा तसं तिला / त्याला भेटून सांगा.


हि चेकलिस्ट जर फॉलो केली तर मला खात्री आहे तुमच्या मनाजोगता जोडीदार तुम्हाला लवकरच मिळेल.


All the best!!!


Warren Buffet said, “The most important decision in your life is who you choose to marry.”



 
 
 

Recent Posts

See All
कॉम्प्रो, इगो आणि लिव्ह-इन!

मागच्या रविवारी माझी मैत्रीण तिच्या मुलीला घेऊन भेटायला आली. बोलताबोलता गप्पा मुलांच्या लग्नाकडे वळल्या. बघता बघता वर्षे उडून गेली अन मी...

 
 
 

Comments


Stay updated and enhance your wisdom about wealth creation

Thanks for subscribing!

bottom of page