top of page

पंछी बनु उडती फिरू मस्त गगनमें ...

मागच्या तीसएक वर्षात महिलांच्या  सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत  अमुलाग्र सुधारणा झालेली आहे. पुरुष आणि महिला यातील फरक शहराततरी जवळजवळ संपत आला आहे. महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन वावरत आहेत. यशस्वी होत आहेत. आपली कर्तबगारी त्यांनी आपल्या  कुवतीने सिद्ध केली आहे. 


महिला आपल्या पायावर उभ्या आहेत. नौकरी करीत आहेत. व्ययवसायातही पुढे आहेत. पैसे कमावत आहेत. पण माझा असा अनुभव आहे कि बऱ्याच महिला, कमावत्या असुनही, त्यांना हवी तितकी आर्थिक जागरूकता  (financial awareness) अजूनही आलेली नाही. आजही, इतकं शिकूनही, बऱ्याच महिलांचे आर्थिक व्यवहार हे  त्यांचे भाऊ, वडील किंवा पतीच सांभाळतात. आणि हि बाब खचितच अभिमानास्पद  नव्हे. एकविसाव्या शतकातील स्त्रीसाठी तर  नक्कीच नाही. 


मी बऱ्याच डॉक्टर, इंजिनीअर महिलांना ओळखतो ज्यांना  अजूनही इंटरनेट बँकिंग करता येत नाही. त्यांनी कधी त्यांचं बँक खातं उघडून  पाहिलं नाही. त्यांच्या नावावर म्युच्युअल फंड, शेअर्स आहेत पण त्यांना डिमॅट अकॉउंट उघडून ते बघता येत नाहीत. आपल्या पगारातून किती पैसे कटतात? हातात किती मिळतात? का? इन्कम टॅक्स किती भरावा लागतो? लाईफ इन्शुरन्स किती? कोणता? त्याचा हप्ता किती? याची त्यांना कल्पना नाही. फक्त महिन्याअखेर ठरलेला पगार बँकेत जमा झाल्याचा मेसेज आला कि त्यांचा नौकरीशी असलेला संबंध संपतो. त्यांच्यासाठी पगार म्हणजे पाहिजे तेंव्हा मॉलमध्ये जाऊन महागडे कपडे, साड्या, दागिने खरेदी करणे. इतकंच. 


पण याला आर्थिक सुबत्ता म्हणता  येईल, आर्थिक स्वातंत्र्य (financial freedom) नव्हे. 

आपल्या हक्काचे पैसे किती? ते कसे आणि कुठे गुंतवले पाहिजेत? आपल्या मुलांचे शिक्षण, आपलं निवृत्तीनंतरचं आयुष्य ह्यासाठी हे पुरेसे आहेत का? या प्रश्नाशी त्यांचं कुठलंच नातं नाही. नवरा नावाच्या प्राण्यावर हे सर्व सोडून ह्या शिकलेल्या मुली आपल्या दुनियेत  दंग आहेत. मजेत आहेत. नवरा हे सगळं बघतो आहे ना? मग मी कशाला त्यात डोकं टाकू? हि सरळसोट भुमिका बऱ्याच महिलांची  आहे. आणि हि एक वस्तुस्थिती आहे. 


पैसे कमावणं आणि ते खर्च करणं सोपं आहे. परंतु  आर्थिक जागरूकता अवलंबून आर्थिक स्वातंत्र्य मिळवणं अवघड आहे. आणि ते कोणाच्या खांद्यावर डोकं टाकून मिळवता येत नाही. आपल्या हिमतीने ते कमवावं लागतं. 

आयुष्यात सगळे दिवस आनंदाचे नसतील हे तर नक्कीच. मार्केटप्रमाणेच आयुष्यदेखील खाली वर हेलकावे खात राहणार. कभी ख़ुशी, कभी गम हा तर आयुष्याचा नियम. सध्या जर दिवस आनंदात जात असतील तर ती चांगलीच बाब आहे. त्या तशा आनंदी दिवसात, असे दिवस लाभले म्हणून दररोज  "अटीट्युड ऑफ ग्रॅटिट्यूड", कृतज्ञता ठेवलीच पाहिजे. पण त्याबरोबरच मनाच्या एका कोपऱ्यात हा भावही सतत हवा कि पुढे चालून  कधी ना कधी कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागणारच. यातून सुटका नाही. असं केल्याने तुमच्या मनाची तयारी  होईल आणि त्या प्रसंगांना तोंड द्यायला तुम्ही खंबीरपणे उभ्या राहाल.   


महिलांना आयुष्यात खालील कठीण  प्रसंगांना तोंड द्यायची वेळ येऊ शकते :-


१.लग्न न झालेल्या मुलींना नौकरी नसणे 

२.त्यामुळे लवकर किंवा नावडत्या  व्यक्तीशी लग्न लाउन दिल्या जाणे 

३.लग्नाआधी ब्रेक अप किंवा लग्नानंतर घटस्फोट  

४.पतीची नौकरी जाणे  

५.स्वतःची नौकरी जाणे 

६.व्यवसायात नुकसान होणे 

७.पतीचे आकस्मिक निधन

८.पतीवर, मुलांवर किंवा वडिलांवर अवलंबून राहावं लागणे

मी कामना करतो कि यातील कोणताही प्रसंग तुमच्या आयुष्यात कधीही येऊ नये. पण देव न करो, दुर्दैवाने जरी असा एखादा प्रसंग आला  तरीही या अशा कठीण प्रसंगातून फक्त एकच बाब तुम्हाला तारून नेऊ शकते  आणि ती म्हणजे "आर्थिक जागरूकतेतून मिळवलेलं हक्काचं आर्थिक स्वातंत्र्य.”


वेळ आल्यावर खिशात जर दमडी नसेल तर कोणी कोणाला विचारत नाही. बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपैया. हे एक व्यावहारिक सत्य आहे. कटू आहे पण शंभर टक्के खरं आहे.

या अशा कठीण परिस्थितीत जर तुमच्याकडे पैसे नसतील किंवा पैश्यांचं योग्य  नियोजन नसेल तर तुम्हाला इतरांवर  अवलंबून राहावंच लागेल. आणि मग त्यामुळे तुमच्या स्वाभिमानाला ठेच ही पोहोचणारच. आणि एकदा का स्वाभिमान गमावला कि मग हातात काहीच उरत नाही. उरतं ते फक्त भलं मोठं शून्य, पारतंत्र्य आणि अंधार. 


त्यामुळेच,


पंछी बनु उडती फिरू मस्त गगनमें ... 

आज मैं आझाद हुं दुनियाकी चमन में !!


हे गाणं गुणगुणत,मुक्तपणे,कोणतीही  चिंता न करता आयुष्य जगायचं असेल  तर आर्थिक स्वातंत्र्य मिळवणं  अत्यावश्यक आहे. हीच काळाची गरज आहे. 

आणि जगण्यातली खरी मजा त्यातच  आहे ... हो ना???

 
 
 

Recent Posts

See All
नाचणाऱ्या नवदुर्गा

शहर का तब्दील होना शाद रहना और उदास रौनक़ें जितनी यहाँ हैं औरतों के दम से हैं ।

 
 
 
मार्केटचा गुरुमंत्र

त्यामुळे मार्केट असो कि तुमचं आयुष्य, सुख-दुःख, यश-अपयश, आशा-निराशा या मनाला विचलित करणाऱ्या अनुभवातही तुम्हाला धीरगंभीर आणि स्थितप्रद्न्य

 
 
 

Comments


Stay updated and enhance your wisdom about wealth creation

Thanks for subscribing!

bottom of page